मम नाम कुरेशी !..या संस्कृत शाळेत ८० टक्के मुस्लिम

मम नाम कुरेशी !..या संस्कृत शाळेत ८० टक्के मुस्लिम

पद्मासनात बसलेल्या अवस्थेत संस्कृत श्लोकांचं पठण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाहून कोणालाही वाटेल की ती नियमित शाळा नव्हे तर एखादं प्राचीन गुरुकूल आहे. पण ती एक संस्कृत शाळा आहे. तिचं नाव आहे ठाकूर हरिसिंह शेखावत मंडावा प्रवेशिका संस्कृत विद्यालय. आणखी एक धक्का आपल्याला पुढे बसतो. या शाळेत ८० टक्के मुलं मुस्लिम आहेत! या राजकीय शाळेत शिकणाऱ्या २७७ विद्यार्थ्यांपैकी २२२ विद्यार्थी मुस्लिम आहे. इथल्या विद्यार्थ्यांसाठी संस्कृत हा केवळ अभ्यासाचा विषय नव्हे तर जीवन जगण्याचा एक भाग झाला आहे. अलीकडेच बनारस हिंदू विद्यापीठात संस्कृत प्राध्यापक फिरोज खान यांच्या नियुक्तीने वादंग उठला होता. या पार्श्वभूमीवर ही शाळा आपलं वेगळेपण दाखवून देते. येथे संस्कृत शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी करिअरसाठी पर्याय म्हणून संस्कृतची निवड केली आहे. नऊ वर्षांची एक विद्यार्थिनी आपली ओळख करून देते, ''मम नाम इल्मा कुरेशी!'' इल्माला संस्कृत श्लोकही तोंडपाठ आहेत. इल्मासारखेच अनेक विद्यार्थी येथे संस्कृत शिकतात. चार भाषांवर प्रभुत्व- याच शाळेत शिकणारा इल्माचा भाऊदेखील संस्कृतमधील कठीण वाक्यही काही मिनिटांत पाठ करतो. या सर्व मुस्लिमांच्या घरी एक-दोन नव्हे तर तब्बल चार भाषा सुखाने नांदतात - संस्कृत, अरबी, हिंदी आणि उर्दू!