चेहऱ्यावर एजिंगच्या खुणा दिसताहेत?; मग जाणून घ्या त्यामागची कारणे

माणसाच्या शरीराला दिवसभरात कमीत कमी आठ ग्लास पाणी आवश्यक असते. शरीराला सर्व शारीरिक कार्य सुरळीत सुरू ठेवण्यासाठी मुबलक पाण्याची गरज असते. पाण्याची पातळी कमी झाल्यास शरीर डिहायड्रेट होते.

    वाढते वय थांबवणे कोणाच्याही हातात नसते. कारण निसर्गनियमानुसार वय हे वाढतच जाणार. पण आजकाल बदलेली जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या सवयी, वातावरणात अचानक होणारे बदल, धुळ आणि प्रदूषण, चिंता-काळजी यामुळे वयाआधीच चेहऱ्यावर म्हातारपणाच्या खुणा दिसू लागतात. यामध्ये चेहऱ्यावर सुरकुत्या येणं, डोळ्याखाली काळी वर्तुळं दिसू लागणं, चेहऱ्यावर काळे डाग आणि चट्टे दिसणं या गोष्टींचा समावेश असू शकतो.वयानुसार चेहऱ्यावर दिसत जाणाऱ्या या एजिंगच्या खुणा लपवणं नक्कीच शक्य आहे. जीवनशैलीत काही विशिष्ट बदल करून तुम्ही चिरतरूण दिसू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनशैलीत थोडेसे  बदल करावे लागतील. कारण या सवयी बदलून तुम्ही केवळ तुमच्या चेहऱ्यावरील खुणाच लपवू शकता असं नाही तर तुम्हाला यामुळे चिरतरूण आयुष्यही लाभू शकते.

    पुरेशी झोप न घेणे
    निरोगी जीवन आणि चिरतरूण दिसण्यासाठी पुरेशी झोप घेणं फार गरजेचं आहे. माणसाला कमीतकमी सात ते आठ तास शांत झोपेची गरज असते. रात्री निवांत लागली तरच सकाळी उठल्यावर फ्रेश वाटतं. मात्र दिवसभर काम करून थकल्यावर जेव्हा रात्री तुम्हाला शांत झोप लागत नाही तेव्हा तुमची फारच चिडचिड होऊ लागते. निद्रानाशामुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. शिवाय यामुळे डोळ्याच्या खाली काळी वर्तुळं दिसू लागतात. यासाठीच दररोज फ्रेश दिसण्यासाठी रात्री पुरेशी झोप घेण्याची सवय स्वतःला लावा.

    व्यसनांच्या आहारी जाणे
    धूम्रपान आणि मद्यपान आरोग्यासाठी हितकारक नाही हे आपल्याला माहीत असते. मात्र तरिही अनेकजण व्यसनांच्या आहारी जातात. अती प्रमाणात धूम्रपान आणि मद्यपान केल्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. ज्यामुळे तुमच्या शरीराची पाण्याची गरज भागवली जात नाही आणि तुम्ही डिहायड्रेट होता. सतत व्यसन केल्यामुळे हळूहळू या सर्व गोष्टींचा परिणाम तुमच्या शरीरावर दिसू लागतो. शरीराला व्याधी जडतात आणि चेहऱ्यावर वयाच्या आधीच म्हातारपणाच्या खुणा दिसू लागतात. यासाठी निरोगी आणि सुंदर दिसण्यासाठी व्यसनांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.

    सतत बाहेर आणि उन्हातून फिरणे
    शरीर आणि त्वचेच्या आरोग्यासाठी शरीराला पुरेशा सूर्यप्रकाशाची गरज असते. यासाठी सकाळचे कोवळे ऊन त्वचेसाठी फायदेशीर असते. मात्र जर तुम्ही सतत सूर्यप्रकाशात फिरत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या त्वचेवर होऊ लागतो. सूर्यप्रकाशात जाताना चांगल्या गुणवत्तेचे सनस्क्रीन लोशन लावणे फार गरजेचे आहे. जर तुम्ही कोणतीही काळजी न घेता वारंवार सूर्यप्रकाशातून फिरत असाल तर तुमच्या चेहऱ्यावर एजिंगच्या खुणा फार लवकर दिसू शकतात. यासाठी गरज असेल तेव्हाच सूर्यप्रकाशात फिरा.

    अती प्रमाणात गोड खाणे
    काही लोकांना सतत गोड पदार्थ खाण्याची सवय असते. गोड पदार्थांतून आहारातील साखरेचे प्रमाण वाढत जाते. अती गोड पदार्थ खाण्यामुळे तुमच्या शरीरात फॅट्सचे प्रमाण वाढू लागते. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे मधुमेहासारखे जीवनशैली आजार होण्याचा धोका वाढतो. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास त्याचा परिणाम तुमच्या त्वचेवरदेखील होऊ लागतो. त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. ज्यामुळे तुम्ही वयाआधीच म्हातारे दिसू लागता.

    पाणी कमी पिणे
    माणसाच्या शरीराला दिवसभरात कमीत कमी आठ ग्लास पाणी आवश्यक असते. शरीराला सर्व शारीरिक कार्य सुरळीत सुरू ठेवण्यासाठी मुबलक पाण्याची गरज असते. पाण्याची पातळी कमी झाल्यास शरीर डिहायड्रेट होते. ज्याचा परिणाम सर्वात आधी तुमच्या त्वचेवर होतो. त्वचेमधील ओलावा कमी झाल्यामुळे त्वचा कोरडी होते. ज्यामुळे तुमच्या चेहरा आणि संपूर्ण शरीराच्या त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात. सहाजिकच या सर्वाचा परिणाम होऊन तुम्ही अकाली म्हातारे दिसू लागता.  दैंनदिन जीवनातील या पाच चुका टाळून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील एजिंगच्या खुणा कमी करू शकता. शिवाय जीवनशैलीत चांगले बदल करून तुम्ही आयुष्यभर चिरतरूण दिसू शकता.