चक्रीवादळाचा पूर्व हवेली तालुक्यातील शेतीला मोठा फटका

लोणी काळभोर : पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांना मंगळवारी झालेल्या चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. उरुळी कांचन, लोणी काळभोर, शिंदवणे, कोलवडीसह हवेलीच्या पूर्व भागात केळी, फळबागा, फुलशेती,

लोणी काळभोर  : पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांना मंगळवारी  झालेल्या चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. उरुळी कांचन, लोणी काळभोर, शिंदवणे, कोलवडीसह हवेलीच्या पूर्व भागात केळी, फळबागा, फुलशेती, भाजीपाला वादळाच्या तडाख्यामुळे जमिनदोस्त झाला आहे. केळी, टोमॅटो, फुलशेती, भाजीपाला व ऊस यासारख्या प्रमुख पिकांचे झालेले नुकसान सुमारे चार कोटीचे झाल्यांचा अंदाज आहे. 

  कोरोनामुळे मागिल दोन महिन्यापासून गुलटेकडी (पुणे) येथील बाजार समिती बंद आहे. त्यामुळे पूर्व हवेलीमधील शेतकरी अगोदरच मोठ्या आर्थिक संकटात सापडला होता. या संकटातून सावरत असतानाच चक्री वादळासारख्या अस्मानी संकटाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सरकारने झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

  पु्र्व हवेलीत मंगळवारी दुपारी तीननंतर अचानक जोराचे वारे सुरु झाले. त्यामुळे कोलवडी, थेऊर, शिंदवणे या प्रमुख गावांतील दोनशेहून अधिक एकरावरील केळीच्या बागा भूईसपाट झाल्या. सोरतापवाडी या गावाची ओळख ही फुलांचे गाव म्हणून आहे. एकट्या सोरतापवाडीच्या हद्दीत हजारो एकर फुलशेती केली जाते. या चक्री वादळामुळे सोरतापवाडी गावातील सत्तर टक्क्यांहुन अधिक फुलशेती भईसपाट झाली आहे. ऊस, टोमॅटो, फ्लॉवर व इतर भाजीपाल्याचेही अतोनात नुकसान झाले आहे. 

  शिंदवणे व आळंदी म्हातोबाची येथील केळी व उसाचे पीक भूईसपाट झाले आहे, तर पेरू, डाळिंबाच्या बागेच्या कळ्या गळून गेल्या आहेत. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडलेले आहेत. ते तत्परतेने बसविण्याचे काम चालले आहे. शिंदवणे गावात गणपत कड, यशवंत शितोळे, आनंद शितोळे, रमेश महाडिक, प्रकाश महाडिक यांचअयासह अनेक अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. 

आळंदी म्हातोबाची येथे आंबा, सिताफळ, डाळिंबाच्या फळबागा भुईसपाट झाल्या आहेत. जोरदार वाऱ्याममुळे शेवग्याची झाडे मधून तुटली आहेत. पालेभाज्यांना छिद्रे पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आळंदी म्हातोबाची येथील लक्ष्मण भोंडवे, साहेबराव जवळकर, परसराम जगताप, कुंडलिक व बबन जवळकर अशा अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कोलवडी येथे केळीसह ऊस पिकाचे नुकसान मोठे झाले आहे. येथील शंकर देवराव ससाणे, रावसाहेब गायकवाड, प्रल्हाद शितोळे, रोहित शितोळे, पुण्यवंत शितोळे, यशवंत शितोळे, नवलसिंग शितोळे या प्रमुख शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

  वादळामुळे पूर्व हवेलीत झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ सुरु करण्यात आले आहेत. मंडल अधिकारी, तलाठी व महसूल खात्याचे कर्मचारी पुढील तीन दिवसात पंचनामे पूर्ण करणार आहेत. पंचनामे पूर्ण होताच पूर्व हवेलीमधील नुकसानीचा नेमका आकडा मिळणार आहे, अशी माहिती हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी यांनी दिली.