१९ जून हा शिवसेनेचा वर्धापन दिन, शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे असते तर ….

१९ जून हा शिवसेनेचा वर्धापन दिन, शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी शिवतीर्थावर आजच्या राजकीय परिस्थितीवर कसे भाषण केले असते, त्याची संकल्पना ज्येष्ठ पत्रकार जयंत

  १९ जून हा शिवसेनेचा वर्धापन दिन, शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी  शिवतीर्थावर आजच्या राजकीय परिस्थितीवर कसे भाषण केले असते, त्याची संकल्पना ज्येष्ठ पत्रकार जयंत करंजवकर यांनी मांडली. 

जमलेल्या माझ्या तमाम…

 जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…

   (तुतारी आणि फटाक्यांचा आवाज… त्यानंतर 

शिवसैनिकांमधून एक साद “अखंड हिंदुस्थानचे कैवारी, प्रबोधनकार सुपुत्र, देव, देश, धर्म, मराठी मनाचे मानबिंदू, हिंदू अस्मितेचे शिरोमणी… हिंदुस्थान, हिंदु, हिंदुस्थानचे एकमेव हिंदुहृदयसम्राट, हिंदु धर्मरक्षक, सरसेनापती, 

माननीय शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असोsss….

       बाळासाहेब अंगावरची शाल नीट करत…

 संपलं तुमचं…  सुरू करू…(एवढ्यात पुन्हा फटाके वाजतात… बाळासाहेब कमरेवर हात ठेवून उभे राहतात… फटाक्यांचा आवाज थांबतो…   आणि ते भाषणाला सुरवात करतात… )

 कालच दिल्लीत कोण ते खाजनाथ काय एकनाथ नाव त्यांचं… (शिवसैनकांनी राजनाथ… राजनाथ असा आवाज दिला) हो… हो राजनाथ सिंह… कलमडला तो आमच्या शिवसेनेवर… म्हणतो उद्धवच सरकार म्हणजे एक सर्कस आहे… त्याचा एक दिवस एकनाथ खडसे होणार बघा… ज्यांनी ज्यांनी सेनेला विरोध केला ते त्यांच्या कर्माने संपले ( शिट्या आणि टाळ्या… बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद अशा घोषणा ….  नाऱ्या… नाऱ्यावर बोला.. ) थांबा नाऱ्याचा समाचार घ्यायचा आहे, तो नंतर घेतो… शिवसेनेच्या जीवावर महाराष्ट्रात कमळाला  हातपाय पसरायला दिले ते फक्त हिंदू म्हणून… आता आमच्याकडे तो कोण संरक्षणमंत्री राजनाथ आला होता एकदा माझ्या मातोश्रीवर… किती वाकला हो माझ्या समोर तो … साले हे वाकतात मातोश्रीवर आणि दिल्लीत यांचा ताठ होतो ( प्रचंड टाळ्या…) पाठीचा कणा… भलताच अर्थ लावून घेवू नका… आमचे पत्रकार मित्र बसलेत त्यांनीही माझे शब्द नीट लिहावे… (मध्येच थापा बाळासाहेबांच्या पुढ्यात पाण्याचा ग्लास ठेवतो…) पाणी कशाला दाखवतोस

 मला?  महाराष्ट्राचं पाणी काय असतं ते त्या राजनाथला दाखवायचं आहे (प्रचंड टाळ्या… अरे हा आवाज कुणाचा… शिवसेनेचा…)  लेकाच्याला माहित नाही, त्याचच सरकार म्हणजे एक सर्कस आहे… त्यांचा रिंग मास्टर मोदी आणि शहा आहे…  त्यांच्या तालावर नाचणारा हा आयाळ नसलेला सिंह… पूर्ण चमन गोटाच म्हणा… केसच नाहीत डोक्यावर मग त्याच्या आयाळच  काय घेवून बसलात !   काय म्हणतो तो (खाजनाथ… खाजनाथ असा सैनिक ओरडतात) हो राजनाथ… देशाचा संरक्षण मंत्री तिथे सीमेवर चीन कुरापती काढतोय आणि चीनने आपली जमीनही बळकावली, त्याबद्दल काहीच बोलायचं नाही… तो छोटा नेपाळ ही आता आपली कुरघोडी करायला लागला तर तिथे पाकिस्तान आपल्या पाचवीलाच आहे…या कमळाबाईला दुसऱ्याच वाकून बघायची फार हौस (प्रचंड हंशा)..

( व्यासपीठावर बसलेले मनोहर जोशींना हसता हसता ठसका लागतो… ) मनोहरजी ठसका लागला… ठसका तुम्हाला नव्हे दिल्लीला लागला पाहिजे ( शिवसेना झिंदाबाद)… जोशींना ठसका लागणारच अनुभव आहे त्यांना… मुख्यमंत्री होते ते राज्याचे ! तर हे राजनाथ सिंह म्हणतात माझ्या उद्धवच सरकार म्हणजे सर्कस…हो सर्कस असेना ती बरी पण तुमच्या दिल्लीच्या मोदी सरकारसारखे सर्किट नाही… (प्रचंड टाळ्या)… बघा ना मोदी म्हणाले होते, आमचे सरकार आल्यावर प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये  जमा करणार, जशी काय बँका मोदींच्या बापाचीच… आणि हो, रात्री ८ वाजता कोणाला न विचारता ती काय नोटबंदी जाहीर केली… आणि आता सगळ्यांना फाट्यावर मारून लॉकडावून जाहीर केले… म्हणून मी म्हणतो दिल्लीचं हे सरकार सर्कट, सटकलेले सरकार आहे… (शिवसेना झिंदाबाद, बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद…) बरं या मोदींना रात्रीचा ८ चा मुहूर्त मिळतो… काय कळत नाही त्याचं हा तर्कटपणा आणि वात्रटपणा ! या मोदीला मला आठवण करून द्यायची आहे… त्या  गोध्रा प्रकरणांची… गोध्रा दंगलीने आमचे  पंतप्रधान अटबिहारी वाजपेयी या मोदींवर भडकले होते. त्यावेळी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते… अटलजींनी मोदींना गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरून हटविण्याची जोरदार तयारी केली होती. लालकृष्ण अडवाणी पण त्यासाठी मुंबईत मला भेटायला आले होते.   मला अटलजींनी फोनवरून विचारले याबाबत, मी वाजपेयी आणि अडवाणी या दोघांना ठणकावून सांगितले होते की मोदींना गुजरात मधून हटवू नका, “मोदींना गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरून हटविल्यास भाजपा गुजरातमधून संपेल किंबहुना हद्दपार होईल. मोदी गया समझो गुजरात से भाजपाभी गया.” आणि म्हणून हा मोदी तुम्हाला आज पंतप्रधान म्हणून दिसतोय. नाहीतर आमचे लालकृष्ण अडवाणी पंतप्रधान झाले असते… अरे, मोदी उपकाराची जाण तरी ठेव… यांचं चिन्ह काय तर कमळ, आणि हे कमळ उभ कशावर असतं तर चिखालावर… तसं यांचे  विचारही चिखलासारखे… म्हणून स्वतःकडची चिखल उद्धववर फेकतात आहेत हे लेकाचे… ( उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है…)  तो अमित शहा गेले अडीच  महिने कुठे होता? त्याला कोरोना झाला होता का? ( शिवसैनकांमधून आवाज, साहेब त्यांची शुगर वाढली होती ) काय? शुगर वाढली होती… वाढणारच, चंद्रकांत पाटलाने (चंपा… चंपा म्हणून सैनिक आवाज करतात) हा चंपा… आमच्या अजित दादांनी या पाटलांच नामकरण केलं… बरोबर ना! याचं चांपाने अमितभाईच्या तोंडात  घातला असेल कोल्हापूरचा ऊस आणि वाढली त्याची शुगर…  दुसरा तो विदर्भवादी देवेंद्र फडणवीस… काय त्याची टरा टरा फाडली आमच्या शरद बाबूंनी… मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार असा फाटेपर्यंत कोकलत होता. 

त्याची पूर्ण वाट लावली… तरीही फडवणीस एकसारखा राजभवना च्या  बिळात जावून बसतो… तर शरद बाबू

तुम्ही आमच्या विरोधात होता मी तुम्हाला माफ केलं. पण मी आपणास एक वचन देतो, एक ना एक  दिवस तुम्ही आपल्या देशाचे पंतप्रधान होणारच (प्रचंड टाळ्या…) या देशाच्या पहिल्या मराठी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना मी पाठींबा दिला होता. पहिला मराठी पंतप्रधान शरद बाबू तुम्हीच, उद्धव हे लक्षात ठेव… ठाकरे कुटुंब एकदा शब्द दिला तर तो मागे घेत नाही…  आणि धनुष्यातून बाण सुटला तर तो मागे घेता येत नाही तसा ठाकरेंचा शब्द आहे. यापुढचा पंतप्रधान शरद पवारच( प्रचंड टाळ्या… शिवसेना झिंदाबाद)… माझ्या शिवसैनिकांना सांगायचे आहे पुढच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या महाविकास आघाडीच्या उमेदवारांनाच निवडून आणायचे  आणि भाजपा मुक्त महाराष्ट्र करायचं… लक्षात ठेवा या कमळा बाईला महाराष्ट्रातून हद्दपार करायचं. तिला तिचे दिवस मला दाखवायचे आहेत. 

 कोण तो भाजपाचा अध्यक्ष नड्डा, काय त्याचा तो चेहरा टरबूजासारखा!  ( प्रचंड टाळ्या)… मी आता व्यंगचित्र काढत नाही … म्हणून हा नड्डा वाचला… व्यंगचित्रसाठी नड्डाचा चेहरा एकदम फिट आहे… (हंशा)  काय म्हणतो तो टरबूज… म्हणे आमच्या मित्र पक्षाने विश्वासघात केला. अरे नड्डा अगोदर हे सांग तुम्ही मित्र पक्षाला मित्र मानत होता का? मित्र म्हणून गळ्यागले घालायचे आणि मित्रांचेच उमेदवार पाडायचे… अरे नड्डा भारतीय जनता पक्षच हा आता विश्वासघाताचा मोठा अड्डा आहे  आणि हो माझ्या शिवसैनिकांनो हा भारतीय जनता पक्षाने दुसऱ्या पक्षाचे खासदार, आमदार फोडून स्वतः साठी आताच खड्डा खणून ठेवला आहे आणि भविष्यात हा पक्ष त्या खड्ड्यात पडणार आहे… जो दुसऱ्यासाठी खड्डा खण तो तोच त्या खड्ड्यात पडतो…

(टाळ्या… शिवसेना झिंदाबाद) कमळाबाई, तुम्ही तुमचा पक्ष वाढविला नाही तर तो सुजविला आहे. कशाला विश्वासघाताच्या गप्पा मारता गोवा, मध्य प्रदेश, बिहार, कर्नाटक मध्ये काँग्रेस पक्षाचे आमदार फोडून तुम्ही काय दिवे लावले हे सर्वांनी पाहिले… अरे नड्डा माझ्या उद्धवने कपटी मित्रा पेक्षा दिलदार शत्रू बरा… हा विचार केला  म्हणून तर त्याला काँग्रेस व राष्ट्रवादी बरोबर जावे लागले… ( शिवसेना झिंदाबाद… उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हा रे साथ है…) नड्डा तू नावालाच राष्ट्रीय अध्यक्ष आहेस,  काम पहातोय तो तुझा तो  अमित शहा… एक दिवस तो शहा तुझ्या चड्डीची नाडीच कधी ओढेल ते तुला कळणार नाही…(प्रचंड टाळ्या… आणि शिट्या) 

 आता तो नाऱ्या… काय म्हणतो महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणा… जसं याच्या  बापाचच राज्य… काय तो राज्यपालकडे जातो आणि त्यांना सांगतो राज्याची परिस्थिती खालावली आहे… अरे नाऱ्या काय तुझी उंची… ती आमच्या टाटाची न्यानो कार तरी बरी…  (शिवसेना झिंदाबाद… बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद)….  राज्यात  राष्ट्रपती राजवट आणा म्हणतो लेकाचा…  आमच्या राज्यपालांना भरपूर वेळ आहे म्हणून ते हल्ली कोणालाही चहा प्यायला बोलावतात. ज्या कमळाबाईला शिवसेनेने  साथ दिली त्या शिवसेनेला संपविण्यासाठी या नाऱ्याला सुपारी दिली त्यांनी. अरे नाऱ्या,  शिवसेनेच्या नादाला लागू नकोस नाहीतर तुझ्याच सुपाऱ्या जागेवर राहणार नाहीत (प्रचंड टाळ्या आणि हंशा ) म्हणे भाजपात  त्याचा पक्ष विलीन केला. इन मीन तीन माणसं असलेला हा महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष भाजपात विलीन झाला. परंतु एक दिवस राणे व त्यांच्या मुलाना भाजपाला विलगीकरण करावे लागेल, कारण हा नाऱ्या जिथे जातो त्या पक्षाची सत्ता जाते. काँग्रेसमध्ये गेला, काँग्रेस सत्तेतून पाय उतार झाली, कमळाबाईचा हात धरला तर कमळाबाई पाय उतार झाली… पनवती आहे तो… (प्रचंड हंशा आणि कोंबडी चोर… कोंबडी चोर अशा घोषणा) 

शिवसैनिकांनो राज्यात कोरोना विषाणू पसरलाय… राज्य सरकारने नियम घातलेत त्याचे तंतोतंत पालन करा… कमळाबाईला राजकारण करायचं ते करू द्या… आपल्याला लोकांचे जीव वाचवायचे आहेत. कोरोना नंतर आता माझ्या कोकण वर चक्रीवादळ आलंय… आणि कमळाबाईच चक्रम वादळ घोंघावतोय… (कुठे आहेत ते संजय रावूत… राजभवनावर रावुत उभे राहतात आणि सर्वांना नमस्कार करतात)  चक्रम वादळ हा आग्रलेख छान लिहिला… उद्धव तू घाबरु नकोस, धीराने तू तोंड देतोस तसचं देत रहा… संकट एकामागून एक येत असतात… शिवसेनेने असे अनेक संकटे पचवली म्हणून शिवसेना ५० वर्षानंतरही ताट मानेनी ती उभी आहे. जो माणूस संकटाला सामोरे जातो, तोच पुढे जातो… आता बराच वेळा झालाय… सध्या राजकीय विषाणू तर आहेच पण करोनचा प्रादुर्भाव वाढतो… म्हणून मी इथेच मी माझे भाषण थांबोतय …   जय हिंद, जय महाराष्ट्र !

.. (शिवसेना झिंदाबाद, बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद, उद्धव ठाकरे झिंदाबाद… आदित्य ठाकरे झिंदाबाद या घोषणेने शिवतीर्थ दुमदुमून गेले)  

संकल्पना – जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार