कळंबोली पोलीस मुख्यालयातील कोव्हिड केअर सेंटरचे गृहमंत्र्यांच्या हस्ते झाले उद्घाटन

पनवेल : कळंबोली रोडपाली येथील पोलीस मुख्यालयातील मल्टीपर्पज हॉलमध्ये उभारण्यात आलेल्या ५० खाटांच्या डेडिकेटेड कोव्हिड केअर सेंटरचे उद्घाटन आज संध्याकाळी ६ वाजता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख

 पनवेल : कळंबोली रोडपाली येथील पोलीस मुख्यालयातील मल्टीपर्पज हॉलमध्ये उभारण्यात आलेल्या ५० खाटांच्या डेडिकेटेड कोव्हिड केअर सेंटरचे उद्घाटन आज संध्याकाळी ६ वाजता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. राज्यात कोरोनाशी सामना करताना तीन हजार पोलिसांना संसर्ग होऊन दुर्दैवाने ३५ जणांना आपला जीव गमवावा लागला. सर्व आयुक्तालय आणि अधीक्षक कार्यालयांना डेडिकेटेड कोव्हिड केअर सेंटर उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे नवी मुंबई आयुक्ताल्यात असे सेंटर सुरू करण्यात आले आहे. या माध्यमातून पोलिसांवर चांगले उपचार करता येणे शक्य  होईल, असे गृहमंत्री यावेळी म्हणाले.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात सुमारे पाच हजार कर्मचारी काम करीत असून लॉकडाऊन सुरू झाल्यापासून हे कर्मचारी नागरिकांना संक्रमण होऊ नये यासाठी पहारा देत आहेत. यावेळी अनेक कर्मचार्‍यांना कोरोनाचा संसर्ग होऊन अनेकांनी यशस्वी मात केली. तर काहींचा दुर्दैवी मृत्यू झाला  आहे. नवी मुंबई पोलीस दलाचे पोलीस आयुक्त संजय कुमार  यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई पोलीस दलामधील पोलिसांना, कोरोना महामारीच्या काळामध्ये व्यवस्थित औषधोपचार मिळावे म्हणून  कळंबोली रोडपाली  येथील पोलीस मुख्यालयातील मल्टीपर्पज हॉलमध्ये ५० खाटांचे डेडिकेटेड कोव्हिड केअर सेंटर उभारण्यात आले आहेे. विशेष म्हणजे सदर सेंटरसाठी आयुक्तालयातर्फे फक्त चार दिवसांमध्ये अत्याधुनिक अशा आठ बाथरूमची सर्व सुविधांसह उभारणी करण्यात आली. पनवेल महानगरपालिकेकडून या सेंटरला डेडिकेटेड कोव्हिड  केअर सेंटर घोषित करण्यात आलेले आहे. त्याचे उद्घाटन आज संध्याकाळी ६  वाजता महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्त संजीव कुमार , सह आयुक्त राजकुमार व्हटकर आणि पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख उपस्थित होते.