म्हसळा शहरात सापडला पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३४ – म्हसळयात ४ दिवस जनता कर्फ्यू

म्हसळा : जून महिना संपता संपता देशासह महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. म्हसळा तालुका मागील अनेक दिवस कोरोनामुक्त होता. मात्र दोन दिवसांपूर्वी खाडीपट्ट्यातील लिपनीवावे

म्हसळा : जून महिना संपता संपता देशासह महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. म्हसळा तालुका मागील अनेक दिवस कोरोनामुक्त होता. मात्र दोन दिवसांपूर्वी खाडीपट्ट्यातील लिपनीवावे येथे कोरोना रुग्ण सापडला आणी एकच खळबळ उडाली. तर १ जुलै २०२० रोजी म्हसळा शहर ग्रामीण रुग्णालयातील ३८ वर्षीय कर्मचाऱ्यालाच कोरोनाची लागण झाली असल्याचे वृत्त समजताच शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बाधित रुग्ण ग्रामीण रुग्णालयाशेजारील इमारतीत गजबजलेल्या ठिकाणी वास्तव्यास आसून तो अनेकांच्या संपर्कात आला असल्याने चिंता निर्माण झाली आहे. तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ३४ झाली आहे पैकी तीन रुग्ण दगावले असून २९ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश कांबळे यांनी दिली आहे. गेल्या दोन दिवसांत आंबेत खाडीपट्टा आणि शहरात एक, एक रुग्ण सापडल्याने आता कोरोना बाधीत रुग्णांत वाढ होईल की काय अशी चिंता सतावू लागली आहे.

लॉकडाऊन, अनलॉक १ कालावधीत म्हसळा बाजारपेठेत नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती त्यातच विनाकारण फिरणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना प्रादुर्भाव होऊ नये याची खबरदारी घेणे आवश्यक असताना अनेक नागरिक चेहऱ्याला मास्क लावण्याची तसदी घेत नाहीत त्यातच शहरात पहिल्यांदाच बाधीत रुग्ण सापडल्याने त्याचा प्रसार अधिक प्रमाणात होऊ नये म्हणून तालुका प्रशासनाकडून २ जुलै ते ५ जुलैपर्यंत जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे. जनता कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सेवेतील सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत दुध डेरी उघड्या राहतील तर मेडिकल आणि वैद्यकीय सेवा दिवसभर उपलब्ध असेल असे म्हसळा नगर पंचायत प्रशासनाने संध्याकाळी बाजारपेठेत दवंडी देऊन कळविले आहे. तालुक्यातील जनतेने चार दिवसाचे जनता कर्फ्यूला सहकार्य करण्याचे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे.