ट्रेनने घरी जाण्याची संधी न मिळालेल्या परप्रांतीय कामगारांनी भिवंडीत घातला गोंधळ – प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी

भिवंडी : लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकून पडलेल्या परराज्यातील मजूर कामगारांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी विशेष श्रमिक ट्रेन सुरू करण्यात आली. एमएमआरडीए क्षेत्रातील पहिला प्रयत्न भिवंडी

 भिवंडी : लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकून पडलेल्या परराज्यातील मजूर कामगारांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी विशेष श्रमिक ट्रेन सुरू करण्यात आली. एमएमआरडीए क्षेत्रातील पहिला प्रयत्न भिवंडी शहरातून करण्यात आला .गोरखपूर जयपूर येथील कामगारांना घेऊन जाणारी श्रमिक ट्रेन रवाना झाल्यानंतर बिहार राज्यातील जनतेसाठी पाटनापर्यंत विशेष श्रमिक ट्रेन सोडण्याचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी पहाटेपासून पोलिसांनी नेमून दिलेल्या ठिकाणी एकत्रित झालेल्या नागरिकांना आवश्यक नोंदणी पूर्ण झाल्याने माघारी पाठविले. त्यामुळे कामतघर रस्त्यावर माणसांचे जथ्थे आपल्या मनातील संताप व्यक्त करीत जात असल्याचे आढळून आले .

एमएमआरडीए क्षेत्रात सर्वात प्रथम भिवंडी ते गोरखपूर ,भिवंडी ते जयपूर विशेष श्रमिक ट्रेन रवाना केल्या. हे दोन्ही प्रयत्न पोलीस प्रशासनाने राबविलेल्या नियोजनबद्ध यंत्रणेमुळे यशस्वी झाल्यानंतर भिवंडी शहरात अडकून पडलेल्या बिहार राज्यातील कामगारांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी पाटनापर्यंत श्रमिक ट्रेन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .त्यासाठी पोलीस उपायुक्त परिमंडळ क्षेत्रातील सहा पोलीस ठाणे हद्दीत निश्चित केलेल्या ठिकाणी नाव नोंदणी सुरू केली असता दोन दिवसात हजारो नागरिकांनी नाव नोंदणी केली . त्यानंतर नावनोंदणी केलेल्या नागरिकांना सकाळी सात वाजता केंद्रांवर बोलविले त्या ठिकाणी पहाटे पासूनच कामगारांनी गावी जाण्यासाठी गर्दी केली .दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांकडून अवघ्या काही तासांमध्ये रेल्वे प्रवासासाठी आवश्यक नाव नोंदणी झाल्याने उर्वरित कामगारांना पोलिसांनी माघारी पाठविले असता कामगारांनी त्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करीत पोलीस व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आम्हाला सकाळी बोलविल्याने आम्ही मुलाबाळांसह या ठिकाणी गावी जाण्याच्या प्रतीक्षेत बसलो परंतु पोलिसांनी आम्हाला हुसकावून लावल्याने आमचा हिरमोड झाला अशी प्रतिक्रिया एक त्रस्त महिलेने दिली आहे .