नागपूरला पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनविण्याचा मानस – डॉ. नितीन राऊत

नागपूर : देशाच्या मध्यभागी आणि विकासाच्या दृष्टीकोनातून अत्यंत सोयीचे असलेल्या नागपूरचा कायापालट करून कोराडी येथे ऊर्जा शैक्षणिक पार्क, भव्य हनुमान मूर्ती स्मारक, सेल्फी पॉइंट, तलाव सौंदर्यीकरण

नागपूर : देशाच्या मध्यभागी आणि विकासाच्या दृष्टीकोनातून अत्यंत सोयीचे असलेल्या नागपूरचा कायापालट करून कोराडी येथे ऊर्जा शैक्षणिक पार्क, भव्य हनुमान मूर्ती स्मारक, सेल्फी पॉइंट, तलाव सौंदर्यीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. सोबतच, फुटाळा तलाव येथे बुद्धिस्ट थीम पार्क, यशवंत स्टेडियम परिसरात जागतिक दर्जाचे अत्याधुनिक नवीन  स्टेडीयम, वाहन विरहीत बिझनेस सेंटर उभारून देश-विदेशातील पर्यटक आणि  नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनविण्याचा मानस असल्याचे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले. महावितरणच्या ऊर्जा अतिथीगृह नागपूर येथे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते.

राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी कोराडी येथे ‘ऊर्जा पार्क’ प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यानुसार, जमीन, पाणी आणि मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध असल्याने नागपूर जवळच्या कोराडी येथे उर्जेचे विविध स्त्रोत आणि त्याचा मानवी जीवनाला होणारा उपयोग लक्षात घेऊन शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना यातून हसत-खेळत शिक्षण मिळावे, त्यांना उर्जेचे स्त्रोत प्रत्यक्ष प्रकल्प स्थळी हाताळता यावे, सोबतच मनोरंजन व्हावे आणि पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण करणे या उद्देशाने हा ऊर्जा पार्क उभारण्यात येणार आहे.
 
ऊर्जा पार्कद्वारे, हरित ऊर्जा, उर्जेच्या  विविध स्त्रोतांना आधुनिकतेची जोड देण्यात येणार आहे. ऊर्जा वनस्पतींचे  उद्यान, सौर विद्युत व्यवस्था, उर्जेच्या विविध स्त्रोतांचे जसे औष्णिक, जल, वायू, पवन, सौर, बायोमास लाइव्ह मॉडेल्स, सौर चार्जिंग स्टेशन्स, परिसर सौन्दर्यीकरण करून हा अभिनव प्रकल्प  प्रस्तावित आहे. एकूणच, पर्यटकांच्या दृष्टीने भव्य हनुमान मूर्ती उभारून यामाध्यमातून पर्यटनाचे हब बनविण्याचे प्रस्तावित आहे. फुटाळा तलाव येथे जागतिक दर्जाचे बुद्धिस्ट थीम पार्क आणि यशवंत स्टेडियम येथे नवीन स्टेडियम आणि बिझनेस सेंटर उभारण्याचे प्रस्तावित आहे.  या  सर्व प्रकल्पांचा आराखडा प्राथमिक अवस्थेत असून निधीची तरतूद करून सदर प्रकल्प साकारण्याचा मानस डॉ.राऊत यांनी व्यक्त केला.
 
 प्रस्तावित प्रकल्पांचे संगणकीय सादरीकरण नागपूरातील प्रसिद्ध वास्तूरचनाकार अशोक मोखा यांनी केले. सादरीकरणानंतर माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी रविंद्र  ठाकरे, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, रमण विज्ञान केंद्राचे संचालक विजय शंकर शर्मा यांची मते जाणून घेण्यात आली तर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे प्रधान सचिव(ऊर्जा) दिनेश वाघमारे, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक महानिर्मिती शैला ए., महाऊर्जा संचालक सुभाष डूमरे, नेहरू विज्ञान केंद्राचे सुर्यकांत कुळकर्णी, अशोक जोगदे एफर्ट प्लेनेटोरीयम, रवी बनकर यांनी आपली मते मांडली आणि प्रकल्प विषयक विधायक सूचना देखील दिल्या. बैठकीचे अध्यक्षस्थान डॉ. नितीन राऊत यांनी भूषविले.  
 
नागपूरपासून केवळ ४० किलोमीटर अंतरावर  घनदाट जंगल आहे. संत्रानगरी सोबतच हा जिल्हा टायगर कॅपिटल म्हणून देखील ओळखला जातो. नागपूर जिल्ह्यात खनिज, वनसंपदा भरपूर असून कोळसा खाणी, गोरेवाडा प्राणी संग्रहालय, औष्णिक विद्युत केंद्रे, आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो, राष्ट्रीय महामार्ग, मध्य आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने हा भाग जोडल्या गेला आहे. दीक्षाभूमी, संघ मुख्यालय, ताजबाग, रामटेकसारखे तीर्थक्षेत्र असल्याने विदर्भाच्या विकासाचे स्वप्न उद्योग उभारून आणि पर्यटनाच्या माध्यमातून पूर्ण करता येतील. पर्यटन हे सर्वांगीण विकासाचे ग्रोथ इंजिन असून यामुळे हॉटेल तसेच सेवा उद्योग विकसित होतील. यामुळे एकूण घरगुती उत्पादन आणि दरडोई उत्पन्न वाढीस लागेल असा विश्वास डॉ. राऊत यांनी व्यक्त केला. बैठकीला नागपूर विभागातील सर्व प्रशासनिक अधिकारी तसेच महानिर्मितीचे  मुख्य अभियंता अनंत देवतारे, नासुप्र मुख्य अभियंता सुनील गुज्जलवार, मेट्रो अधिकारी राजीव एल्कावार, आणि हाय पॉवर कमिटीचे अनिल नगरारे, रमाकांत मेश्राम आणि अनिल खापर्डे प्रामुख्याने उपस्थित होते.