मालमत्ता कर आणि आणि पाणी बिलात सवलत द्या – मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांची आयुक्तांकडे मागणी

कल्याण : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रोजगार आणि व्यवसाय बंद असल्याने एप्रिल २०१९ ते मार्च २०२० च्या मालमत्ता कर आणि मार्च ते मे महिन्याच्या पाणी बिलात ५० टक्के सवलत देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण

कल्याण : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रोजगार आणि व्यवसाय बंद असल्याने एप्रिल २०१९ ते मार्च २०२० च्या मालमत्ता कर आणि मार्च ते मे महिन्याच्या पाणी बिलात ५० टक्के सवलत देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण पश्चिमचे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोर्नाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. पालिकेकडून नागरिकांना या काळात आवश्यक त्या सुविधा पोहोचविण्याचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. कल्याण-डोंबिवली ही दोन्ही शहरे तशी कामगार आणि चाकरमान्यांची वस्ती आहे. मागील दीड महिन्यापासून लोकांचे व्यवसाय टाळेबंदीमुळे बंद आहेत. हे अजून किती दिवस चालेल याची निश्चित कल्पना कुणालाच नाही. या शहरातील रुग्ण साखळी तोडण्यात आपण काही अंशी यशस्वी झालो आहोत, मात्र या शहरातील जी मंडळी अत्यावश्यक सेवेसाठी मुंबई, ठाणे येथे जात आहेत,  त्यामुळे रोजची रुग्णसंख्या वाढत आहे.

रोजगार, व्यवसाय व खाजगी कंपनी वा अस्थापनामध्ये काम करणाऱ्या नागरिकांचे उत्पन्न या काळात पूर्णतः बंद आहे. ही बाब लक्षात घेऊन एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या एक वर्षांच्या मालमत्ता करात ५० टक्के व मार्च ते मे महिन्याच्या पाणी बिलात ५० टक्के सवलत देण्यात यावी. मनपाची आर्थिक परिस्थिती पाहता वरील दोन्ही उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत असले तरीही, मागील थकबाकी वसुलीवर अधिक लक्ष केंद्रित करून आजपर्यंत आपण नागरिकांना जसे सहकार्य केले आहे, त्यानुसार याबाबतही सहकार्य करून नागरिकांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.