पुणे – नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पास मिळणार गती

नारायणगाव - पुणे - नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारची मंजुरी मिळावी यासाठी आज दि. ०५ रोजी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पुढाकारातून राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्त आणि नियोजन

नारायणगाव – पुणे – नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारची मंजुरी मिळावी यासाठी आज दि. ०५ रोजी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पुढाकारातून राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्त आणि नियोजन खात्याचे मंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी अनुकूल प्रतिसाद दिल्यामुळे या प्रकल्पाला गती देण्यात डॉ. कोल्हे यांना यश आले आहे.  गेल्या वर्षभरापासून रेल्वे मंत्रालयाकडे पुणे – नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल मंजुरीच्या प्रतीक्षेत होता. त्यामुळे डीपीआरला मंजुरी मिळावी यासाठी गेल्या काही महिन्यांपासून डॉ. कोल्हे प्रत्येक टप्प्यावर पाठपुरावा करीत होते. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात त्यासाठी विशेष प्रयत्न त्यांनी केला होता. या प्रयत्नांना अखेरीस यश मिळाले आणि २ जून रोजी या प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाने  मंजुरी दिली.   

रेल्वे मंत्रालयाची मंजुरी मिळताच खासदार डॉ. कोल्हे यांनी तत्काळ  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधून पुणे – नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या सादरीकरणासाठी वेळ मागितली होती. मात्र बुधवारी निसर्ग चक्रीवादळ धडकणार असल्याने उपमुख्यमंत्र्यांनी गुरुवारी (दि. ४ रोजी) वेळ दिली. त्याबरोबर डॉ. कोल्हे यांनी महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश जैस्वाल यांना सादरीकरणाच्या तयारीनिशी मंत्रालयात येण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार दुपारी साडेतीन वाजता  जैस्वाल यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष सिंह, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव राजीव जाधव, खासदार डॉ. कोल्हे आदी उपस्थित होते. 

सुमारे तासभर चाललेल्या या सादरीकरणा दरम्यान वित्त, नियोजन आणि परिवहन या तीनही विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी प्रकल्पासाठी येणारा खर्च व अन्य तांत्रिक बाबींवर चर्चा केली. त्यांच्या शंकांचे श्री. जैस्वाल यांनी निराकरण केले. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प महत्त्वाचा असून या प्रकल्पाच्या सर्व बाजू समजावून घेऊन आवश्यक सूचना केल्या. तसेच आपण या प्रकल्पाबाबत सकारात्मक असल्याचे संकेत दिले.  या बैठकीमुळे गेल्या २५ वर्षांपासून जुन्नर, आंबेगाव, खेडसह शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेने पाहिलेले स्वप्नं आता प्रत्यक्षात उतरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेली १५ वर्ष शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनता फक्त रेल्वे प्रकल्प होणार हे ऐकत होती. पण ती प्रत्यक्षात रुळावर केव्हा धावणार हा विषय लोकसभा निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरला होता. त्यावेळी डॉ. कोल्हे यांनी आपण निवडून आल्यावर पुणे – नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते.

वर्षभरापासून डॉ. कोल्हे गेली अनेक वर्ष रखडलेल्या या प्रकल्पाचा पाठपुरावा करीत होते. त्यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळाल्याने त्यांनी मतदारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे.  या संदर्भात बोलताना खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले की, आजचे प्रकल्पाचे सादरीकरण अतिशय प्रभावी झाले असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह परिवहन, वित्त व नियोजन या तीनही विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी अनुकूल प्रतिसाद दिला असून राज्य सरकारकडून या प्रकल्पाला मंजुरी मिळावी यासाठी मी प्रत्येक स्तरावर पाठपुरावा करणार असून  मतदारसंघातील जनतेचं हे स्वप्न नक्की पूर्ण करु असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.