सोशल डिस्टन्सिंग पाळत कल्याणमध्ये तळीरामांच्या दारुच्या दुकानासमोर रांगा, दुकाने न उघडल्याने घोर निराशा

कल्याण : कल्याणमधील तळीरामांची आज घोर निराशा झालेली पाहायला मिळाली. आजपासून वाईन शॉप उघडतील या आशेने अनेक तळीराम सकाळपासूनच वाईन शॉपबाहेर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून रांगेत उभे होते. मात्र

 कल्याण : कल्याणमधील तळीरामांची आज घोर निराशा झालेली पाहायला मिळाली. आजपासून वाईन शॉप उघडतील या आशेने अनेक तळीराम सकाळपासूनच वाईन शॉपबाहेर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून रांगेत उभे होते. मात्र पालिका आयुक्तांनी केवळ अत्यावश्यक सेवांचीच दुकाने सुरु राहणार असल्याचे आदेश दिल्याने, रांगेत उभे असलेल्या या तळीरामांची घोर निराशा झाली. अनेक ठिकाणी तर दुपारपर्यंत वाईनशॉप बाहेर दारू मिळेल या आशेने हे तळीराम ठाण मांडून होते.  

लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्याबाबत सरकारने नुकतेच जाहीर केले. मात्र प्रत्येक झोनप्रमाणे हे नियम वेगळे असले तरी कल्याण डोंबिवलीत आज सकाळी मोठया संख्येने नागरिक घराबाहेर पडलेले पाहायला मिळाले. तर विशेष म्हणजे कल्याण डोंबिवलीतील वाईन शॉपबाहेर लोकांनी भल्यामोठ्या रांगा लावलेल्या पाहायला मिळाल्या. त्यामुळे आधीच दिवसागणिक वाढत जाणाऱ्या कोरोनाचा धोका या गर्दीमुळे आणखीनच वाढला आहे. वास्तविकपणे शासनाचे लॉकडाऊन शिथिल करण्याबाबतचे नियम आल्यानंतर त्याबाबत गोंधळाचे वातावरण होते. आज सकाळी सकाळी महापालिका आयुक्तांनी याबाबत निर्देश देत ‘कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात अत्यावश्यक सेवा वगळता कोणतीही दुकाने उघडणार नसल्याचे’ स्पष्ट केले. वाईन शॉप उघडलेले नसतानाही दुकानाबाहेर लोकांच्या मोठ्या रांगा दिसून आल्या. काही वाईनशॉप बाहेर सोशल डिस्टन्सींगचे पालन करण्यासाठी ठराविक अंतरावर वर्तुळे देखील काढण्यात आली होती. या वर्तुळांमध्ये हे तळीराम उभे राहून दुकाने कधी उघडेल याची वाट पाहत होते. मात्र आयुक्तांनी फक्त अत्यावश्यक सेवांचीच दुकाने सुरु ठेवण्याचे आदेश दिल्याने या तळीरामांची घोर निराशा झाली. 

तर केडीमेसी क्षेत्रात लागू असलेल्या नियमानुसार फक्त अत्यावश्यक सेवा पुरविणारी दुकाने चालू राहतील, इतर कोणतीही दुकानं किंवा आस्थापना, कारखाने चालू करण्यास मनाई आहे. त्याबाबत योग्य वेळी नव्याने आदेश प्रसिद्ध करण्यात येतील अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. त्यामुळे व्यापारी आणि नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. आणि अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या दुकानाव्यतिरीक्त ईतर कोणतीही दुकाने, आस्थापना , कारख़ाने सुरू करण्यास घाई गडबड करू नये असे महापालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रशासनाला योग्य सहकार्य करून नागरिकांनी घरी सुरक्षित राहा, असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे.