नागपूर.  पावसामुळे कोथिंबीरचे बहुतांश पीक खराब झाले असून आवक फारच कमी आहे. नाशिक, नांदेड आणि छिंदवाडा येथून आवक बंद आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपुरात कोथिंबीर २०० रुपये किलो विकले जात असतानाच रविवारी अचानक वाढ होऊन कॉटन मार्केट ठोक बाजारात ३०० तर किरकोळमध्ये ३५० रुपयांपेक्षा जास्त भाव होते. सर्वाधिक भाव असतानाही ग्राहकांनी खरेदी केल्याची माहिती महात्मा फुले बाजार अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. हिरव्या पालेभाज्यांची आवक कमी असली तरी पालक मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. रविवारी ठोकमध्ये १० रुपये तर किरकोळमध्ये २० रुपये भाव होते. याशिवाय मेथी पंढरपूर येथून येत असून ठोकमध्ये दर्जानुसार ८० ते १०० रुपये तर चवळी भाजी ३० रुपये किलो विकल्या गेली.