याला वेसण घालणार कोण? कलम ३७० पुन्हा लागू करू दिग्विजयसिंह यांचे बेजबाबदार वक्‍तव्य

बेजबाबदार वक्तव्य करून काँग्रेस पक्षापुढे अडचण निर्माण करणे हा जणू दिग्विजयसिंह यांचा स्वभावच झालेला आहे. ज्या वादग्रस्त मुह्यांवर काँग्रेसपक्ष मौन साधून असते, त्यावर दिग्विजयसिंह वक्‍तव्य करतात आणि पक्षाला गोत्यात आणतात.

    दिल्लीमध्ये अतिरेक्यासोबत झालेल्या सशस्त्र चकमकीत पोलिस निरीक्षक मोहनचंद शर्मा शहीद झाले. यावर दिग्विजयसिंहांनी बेजबाबदार वक्‍तव्य केले होते. आता क्लब हाऊसमध्ये एका मुलाखतीत पाकिस्तानी पत्रकाराने विचारलेल्या प्रश्‍नाच्या उत्तरात दिग्विजयसिंह म्हणाले की, केंद्रामध्ये काँग्रेस सरकार सत्तेवर आले तर जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करू. हे वक्तव्य करताना दिग्विजयसिंहांनी सोनिया आणि राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा केली होती काय?

    दिग्विजयसिंगांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसवर टीका करण्याची भाजपाला पुन्हा संधीच मिळालेली आहे. जम्मू-काश्‍मीरला देशाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने कलम ३७० संसदेत बहुमताने रद्द करण्यात आलेले आहे. या कलमानुसार जम्मू-काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला होता. कलम ३७० आणि ३५ ए रद्द करण्यामागील उद्देश असा होता की, ही कलमे रद्द केल्यामुळे देशातील दहशतवादी कारवायांवर अंकुश लावता येईल.

    देशाच्या हिताच्या दृष्टीने घेतलेल्या या निर्णयांना दिग्विजयसिंह विरोध करीत आहेत. दिग्विजयसिंहांच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तानला बळ मिळत आहे. ही कलमे रद्द केल्यमुळे पाकिस्तानचा तिळपापड झाला होता. दिग्विजसिंगांच्या या वक्तव्याचे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी समर्थन केले आहे. या वक्तव्यामुळे उमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांच्यासह हुर्रियतच्या नेत्यांनाही आनंद झाला असेल. भाजपाला विरोध करायचा म्हणून दिग्विजयसिंहांनी राष्ट्रहिताला बाधक होईल, अशा कोणत्याही निर्णयाचे समर्थन करू नये.

    Who will cover it Lets re apply section 370 Digvijaya Singhs irresponsible statement