‘गरीबांना मारायचे, पण बीफचा प्रचार करणाऱ्या मंत्र्यां-संत्र्यांना अभय द्यायचे, असे हे नवहिंदुत्व’

आजही हिंदुस्थानातून ‘टनोटन’ बीफ निर्यात होत आहे व त्यातून येणाऱ्या परकीय चलनावर देशाचा गाडा चालला आहे. पण लहानसहान लोक मात्र ‘बीफ’ प्रकरणांत झुंडबळी ठरत आहेत. गरीबांना मारायचे, पण बीफचा प्रचार करणाऱ्या मंत्र्यां-संत्र्यांना अभय द्यायचे, असे हे नवहिंदुत्व खुळखुळय़ाप्रमाणे वाजवले जात आहे. मेघालयचे भाजपचे मंत्री सनबोर शुलाई यांनी ‘बीफ’ खाण्याचे समर्थन केले म्हणून त्यांस फासावर लटकवा, देशद्रोही ठरवा असे आम्ही म्हणणार नाही, पण ‘बीफ’प्रकरणी ज्यांचे ‘झुंडबळी’ गेले, बीफ बाळगले म्हणून ज्यांना अपमानित ठरवून गुन्हे दाखल केले गेले, त्या सगळय़ांची माफी मागा! कारण भाजपच्या मंत्र्यानेच ‘बीफ’चे समर्थन केले आहे.

    उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली व इतरत्र गाई म्हणजे गोमाता व गोवा, केरळ ईशान्येकडील राज्यांत त्या गोमाता नसून फक्त एक उपयुक्त पशू असल्याचे मानावे, असे कोणाचे म्हणणे असेल तर ते वागणे- बोलणे ढोंगीपणाचे आणि दुटप्पी आहे. याबाबतही राज्यानुसार कायदा बदलून कसे चालेल? गोमातांच्या बाबतीतही समान नागरी कायदाच हवा. गाईंना ‘डोके’ असते तर गोवा, ईशान्येकडील राज्यांत गाईंचे शिष्टमंडळ राजभवनात जाऊन राज्यपालांना भेटले असते व इतर राज्यांत ज्याप्रमाणे गोवंश हत्याबंदी आहे तसा कायदा लावून आमच्या कत्तली थांबवा अशी मागणी करणारा हंबरडा त्यांनी फोडला असता, अशा शब्दांत शिवसेनेनं (Shivsena) केंद्रातील मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार निशाणा साधला आहे.

    भाजपचे मंत्री सनबोर शुलाय यांनी चिकन, मटन, मासे न खाता गोमांस खावे असा सल्ला लोकांना दिला. या विधानावरून शिवसेनेनं भाजपाच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित करत संताप व्यक्त केला आहे. “भारतीय जनता पक्ष हा एक हिंदुत्ववादी पक्ष आहे, पण त्यांचे हिंदुत्व राजकीय सोयीचे आहे काय, याचे आत्मपरीक्षण त्यांनीच करण्याची वेळ आली आहे. दुसऱ्या मोदी पर्वात गोवंश हत्येचा विषय बासनात गुंडाळला गेला असून गोमातांचा दर्जा खाली गेला आहे”, असं म्हणत शिवसेनेनं झुंडबळी ठरलेल्यांची भाजपाने माफी मागावी अशी मागणी केली आहे.

    शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाजपच्या हिंदुत्ववादी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. दुसऱ्या मोदी पर्वात गोवंश हत्येचा विषय बासनात गुंडाळला गेला असून गोमातांचा दर्जा खाली गेला आहे,’ असं म्हणत शिवसेनेनं झुंडबळी ठरलेल्यांची भाजपाने माफी मागावी अशी मागणी केली आहे.

    मेघालयमधील भाजपचे मंत्री सनबोर शुलाय यांनी चिकन, मटन, मासे न खाता गोमांस खावे असा सल्ला लोकांना दिला. शुलाय यांनी मांडलेल्या भूमिकेचा शिवसेनेनं सामना अग्रलेखातून समाचार घेतला आहे. “भारतीय जनता पक्ष हा एक हिंदुत्ववादी पक्ष आहे, पण त्यांचे हिंदुत्व राजकीय सोयीचे आहे काय, याचे आत्मपरीक्षण त्यांनीच करण्याची वेळ आली आहे. मेघालयात भारतीय जनता पक्षाचे मंत्री सनबोर शुलाई यांनी देशातील समस्त मांसाहारी मंडळींना एक दिव्य संदेश दिला आहे. मंत्रिमहोदय सांगतात, ‘लोकहो, चिकन, मटण, मासे कसले खाता? बीफ खा बीफ! गोमांस खा. त्यातच मजा आहे!’ गोमांस भक्षणाची ही अशी तरफदारी करणाऱ्या भाजपा मंत्र्यांनी असे हिंदुत्वविरोधी वक्तव्य करूनही या महाशयांचा बालही बाका झाला नाही. हे असे विधान भाजपाची सत्ता नसलेल्या एखाद्या राज्यात झाले असते तर एव्हाना त्या मंत्र्याच्या घरास घेराव घालून त्यास बडतर्फ करण्याच्या मागण्या सुरू झाल्या असत्या. इतकेच काय, ज्या सरकारातला मंत्री गोमांस भक्षणाचे समर्थन करतोय ते सरकार पक्के देशद्रोही, पाकिस्तानप्रेमी असल्याचे सांगत त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणीही झाली असती, पण भाजपाच्या मंत्र्याने गाई कापून खा असे बेताल विधान करूनही एकाही भाजपा प्रवक्त्याने गोमातेच्या सन्मानार्थ प्रतिक्रिया दिल्याचे दिसत नाही”, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.