यावर सांमजस्याने तोडगा काढायलाच हवा; आधुनिक इतिहासातूनच ईशान्येतील हिंसाचाराचा जन्म

दोन राज्यांतल्या हिंसक सीमावादात मिझोराम पोलिसांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल केल्याची प्रजासत्ताक भारतातील एक आगळी घटना घडली.

    आसाम आणि मिझोराम या दोन राज्यांमधला सीमावाद हिंसक झालेला असून आता तर मिझोराम पोलिसांनी आसामचे मुख्यमंत्री हिंमत बिस्वसरमा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्र्यांखेरीज आसामचे चार ज्येष्ठ पोलीस अधिकारी आणि अन्य अधिकार्‍यांसह दोनशे अज्ञात पोलीस कर्मचार्‍यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या सर्वांवर हत्येचा प्रयत्न आणि गुन्हेगारी षड्यंत्रासह अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    ही प्रजासत्ताक भारतातील एक आगळी व दूरगामी परिणाम करणारी घटना आहे. हिंसाचाराच्या दोनच दिवस आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा या भागात दौरा झाला. तेव्हा त्यांनी आठही मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली आणि लवकरात लवकर आपापसातला सीमावाद संपवा, अशी सूचना केली. हे वाद २०२४ साली होत असलेल्या लोकसभा निवडणुकांपूर्वी सुटावे, अशी अपेक्षा शहांनी व्यक्‍त केली होती.

    या दोन राज्यांत अतिक्रमणावरून वाद सुरू झालेला आहे. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापासून आसाम-मिझोराम यांच्यातील १६५ किलोमीटर लांब असलेल्या सीमेवर अशा चकमकी सुरू झालेल्या आहेत. आयझोल, कोलासिंब आणि ममित हे मिझोराम राज्याचे तीन जिल्हे आहेत. या तीन राज्यांच्या सीमा कछार,  हैलाकांडी आणि करीमगंज या तीन जिल्ह्यांशी भिडते. जसा कछार जिल्ह्याच्या सीमेबद्दल वाद आहे तसाच करीमगंज-ममित यांच्यातही आहे.

    आसाम, नागालँड, मणिपूर, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मेघालय आणि सिक्कीम या आठ राज्यांच्या मिळून ईशान्य भारत होतो. यात सीमावर्ती अरुणाचल प्रदेश हे राज्य आकाराने मोठे असले तरी आसाम हे क्रमांक दोनचे राज्य फार महत्त्वाचे ठरते. आसामची लोकसंख्या (३ कोटी १२ लाख) इतर सात राज्यांपेक्षा जास्त आहे. आसाममध्ये आर्थिक प्रगतीचा वेगही इतर सात राज्यांपेक्षा जास्त आहे. अशा स्थितीत या राज्यांत इतर सात राज्यांतून नोकरीसाठी स्थलांतर करणाऱ्यांची संख्या लक्षणीय असणे स्वाभाविकच आहे.

    परिणामी आसामींच्या मनात बिगरआसामींबद्दल तुच्छता तर बिगर आसामींच्या मनात आसामींबद्दल असूया असणेसुद्धा अपरिहार्य म्हणावे लागेल हा एक भाग. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे स्वातंत्र्यानंतर या भागाचा नकाशा वारंवार बदलत आलेला आहे. हे घटक लक्षात घेतले तर आता समोर आलेला हिंसाचार काही प्रमाणात उलगडू शकेल.आधुनिक इतिहासाची साक्ष काढल्यास असे दिसेल की, आजचे मिझोराम हे राज्य एकेकाळी आसाम राज्याचा भाग होता.

    हा भाग १९७२ मध्ये केंद्रशासित प्रदेश बनला आणि १९७८ मध्ये या भागाला राज्याचा दर्जा मिळाला. खदखदत असलेल्या असंतोषाची बीजं इंग्रजांच्या राजवटीपर्यंत मागे नेता येतात. १८७५ च्या अधिसूचनेनुसार ‘लुशाई हिल्स’ आणि ‘कछार पठार’ यांच्यातील सीमा निश्‍चित करण्यात आल्या. नंतर १९३३ मध्ये लुशाई हिल्स आणि मणिपूर यांच्या सीमा निश्चित करण्यात आल्या.

    आता मिझोरामचा आग्रह आहे की, या सीमा १८७५ च्या अधिसूचनेच्या आधाराने निश्‍चित केल्या पाहिजे तर आसामच्या मते या सीमा १९३३ च्या अधिसूचनेवर असल्या पाहिजेत. हा वाद आता रक्तरंजित झाला आहे. तसं पाहिलं तर ईशान्य भारतातील राज्यांतील सीमांचा वाद नवीन नाही. मिझोरामची एक सीमा त्रिपुरा राज्याला भिडते तर मणिपूरची नागालॅडशी. नागालॅड-मणिपूर यांच्यातही सीमावाद आहेत.

    Violence in the Northeast is born out of modern history