काबूलवर ड्रोन हल्ला ही अमेरिकेची मोठी चूक, दहशतवाद्यांऐवजी ७ मुलांसह १० अफगाणी नागरिक झाले होते ठार, अमेरिकेच्या सैन्याने मागितली माफी

ISIS या दहशतवादी संघटनेच्या संशयितांवर कारवाई करण्याच्या उद्देशासाठी हा ड्रोन हल्ला करण्यात आला होता, अशी माहिती अमेरिकन सैन्याच्या सेंट्रल कमांडचे प्रमुख जनरल केनेथ मेकेंजी यांनी दिली आहे. ISISचे दहशतवादी काबूल विमानतळावर हल्ला करण्य़ाच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तहेर यंत्रणांकडे असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

    वॉश्गिंटन- अफगाणिस्थानची राजधानी काबूल येथे २९ ऑगस्ट रोजी केलेला ड्रोन हल्ला ही मोठी चूक होती, असे अमेरिकेच्या सैन्याने मान्य केले आहे. तसेच या प्रकाराबाबत अमेरिकेन सैन्याच्या वतीने माफीही मागण्यात आली आहे. या ड्रोन हल्ल्यात १० अफगाणी नागरिक ठार झाले, त्यात सात लहानग्यांचा मृत्यू झाल्याची माहितीही अमेरिकेकडून पहिल्यांदाच देण्यात आली आहे.

    ISIS या दहशतवादी संघटनेच्या संशयितांवर कारवाई करण्याच्या उद्देशासाठी हा ड्रोन हल्ला करण्यात आला होता, अशी माहिती अमेरिकन सैन्याच्या सेंट्रल कमांडचे प्रमुख जनरल केनेथ मेकेंजी यांनी दिली आहे. ISISचे दहशतवादी काबूल विमानतळावर हल्ला करण्य़ाच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तहेर यंत्रणांकडे असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

    या  ड्रोन हल्ल्यात दहशतवाद्यांऐवजी सर्वसामान्य अफगाणी नागरिकांचा बळी गेला, याबाबत अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन यांनी दु:ख व्यक्त केले आहे. काबूलच्या ड्रोन हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या अफगाण नागरिकांच्या कुटुंबीयांचे त्यांनी सांत्वन केले आहे. झालेल्या प्रकाराबाबत आम्ही माफी मागतो, या चुकीतून मोठा धडा घेतल्याचेही ऑस्टिन यांनी म्हटले आहे. तर जनरल केनेथ यांनी मृत परिवाराच्या कुटुंबांना नुकसान भरपाई कशी मिळेल, याबाबत विचार सुरु असल्याचे सांगितले आहे.

    एका पांढऱ्या रंगाच्या टोयॅटो कारवर अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी संशय व्यक्त केला होता. या गाडीचा वापर ISISचे दहशतवादी काबूल विमानतळावर हल्ला करण्यासाठी करणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. त्यानंतर अमेरिकन सैन्याने ८ तास या कारच्या हालचालीवर पाळत ठेवली होती. त्यानंतर ठरवलेल्या परिसरात या कारवर ड्रोन हल्ला करण्यात आला होता. मात्र गुप्तहेर यंत्रणांनी माहिती चुकीचे असल्याचे निष्पन्न् झाले. ज्यावेळी या गाडीवर हल्ला झाला, त्यावेळी सर्वसामान्य नागरिक घटनास्थळी असल्याचे दिसले नसल्याचेही मेकेंजी यांचे म्हणणे आहे.