पुढील 48 तास महत्त्वाचे! मेघगर्जनेसह कोसळणार पावसाची शक्यता

आज विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार आहेत

    मुंबई: मान्सून गायब झाल्यानंतर आता राज्यात किमान तापमानात (Temperature In Maharashtra) किंचित घट झाली असून अनेक ठिकाणी गारवा जाणवत आहे. पण मुंबईत अद्याप दमट आणि गरम हवामानाची नोंद करण्यात आली आहे. असं असलं तरी पुढील 48 तासांत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा  इशारा देण्यात आला आहे.

    आज विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार आहेत. नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, बुलडाणा, जालना, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर आणि गडचिरोली अशा एकूण अठरा जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी केला आहे.

    पुढील काही तासांत या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.