काळजी घ्या अन्यथा…आता विनामास्क फिरणाऱ्यांची खैर नाही; एक हजार मार्शल ठेवणार लक्ष

गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर बचावासाठी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र कोरोनाची तिसरी लाट आणि ओमायक्राॅन विषाणुचा धोका निर्माण झाला असतानाही १५ टक्के मुंबईकर विना मास्क फिरत असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले आहे.

  • प्रत्येक वॉर्डमध्ये ३० ते ६० जणांची नेमणूक

मुंबई : कोरोना व्हेरिएंट (Corona Varient) रोखण्यात यश आले असले तरी ओमायक्राॅन विषाणूचा (Omicron Varient) प्रसार झपाट्याने होत आहे. ओमायक्राॅन विषाणू घातक नसला तरी अधिकाधिक लोकांना लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ओमायक्राॅन विषाणूला रोखण्यासाठी तोंडावर मास्क लावणे गरजेचे असून विना मास्क (Without Mask) फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आता प्रत्येक वॉर्डात ४० ते ६० क्लीन अप मार्शलची (Clean Up Marshals) नियुक्ती करण्यात येणार आहे. पालिकेच्या २४ वॉर्डात एक हजार क्लीन अप मार्शलची गस्त राहणार असून पिचकारी बहाद्दरांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर बचावासाठी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र कोरोनाची तिसरी लाट आणि ओमायक्राॅन विषाणुचा धोका निर्माण झाला असतानाही १५ टक्के मुंबईकर विना मास्क फिरत असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे विना मास्क फिरणाऱ्यांवर क्लीन अप मार्शलच्या माध्यमातून ही कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार आहे.

तसेच पोलिसांनाही विमामास्क फिरणार्‍यांवर कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले. दरम्यान, तिसरी लाट आटोक्यात आली असली तरी सद्यस्थितीत असणार्‍या ७५० मार्शलची संख्या कायम ठेवून विभागानुसार कारवाईसाठी आणखी मार्शल वाढवण्यात येणार आहेत. दरम्यान, विनामास्क फिरणार्‍यांकडून आणि उघड्यावर थुंकणार्‍यांकडून २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात येत आहे.

८७ कोटी ११ लाखांचा दंड वसूल

कोरोना काळात विनामास्क फिरणार्‍या ४३ लाख ८१ हजार ५६२ जणांवर कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत तब्बल ८७ कोटी ११ लाख ८१ हजार ४७५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये पालिकेच्या माध्यमातून ३४ लाख ९७ हजार १४९ जणांवर कारवाई करण्यात आली असून ६९ कोटी ४२ लाख ९८ हजार ८७५ रुपयांचा वसूल करण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांकडून ८ लाख ६० हजार ५२२ जणांवर करण्यात आलेल्या कारवाईत १७ कोटी २१ लाख ४ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर रेल्वेत २३८९१ जणांवर कारवाई करण्यात आली असून ४७ लाख ७८ हजार २०० जणांवर कारवाई करण्यात आली आहे.