पेण येथे चार कुटुंबांना टाकले वाळीत

    पेण : नवघर गावातील वाळीत टाकलेल्या चार कुटुंबातील २२ जणांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Collector Office) आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या प्रसंगावधनाने (Police Alert) त्यांना रोखण्यात यश आल्याने फार मोठा अनर्थ टळला आहे. शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. अलिबाग पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांची मध्यस्थी केली. वाळीत कुटुंबांना त्रास देणाऱ्यांविरोधात पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे.

    पेण तालुक्यातील नवघर गावात देवाच्या पालखी सोहळ्यात तंटा (Dispute) निर्माण झाला होता. यावेळी काही कारणास्तव देवेंद्र कोळी आणि त्याच्या चार कुटुंबांना गावाने वाळीत टाकले होते. त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी या कुटुंबाबरोबर स्नेहसंबंध तोडले. याबाबत वाळीत कुटुंबांनी प्रशासनाकडे अर्जही केला. प्रशासनाने दोन्ही गटात सामंजस्य करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र, तो असफल झाला.

    पेण उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी बैठक घेऊन हा प्रश्न सोडवला. त्यानंतर चार महिने सर्व एकोप्याने राहत होते, मात्र, पुन्हा ग्रामस्थांनी या कुटुंबांना वाळीत टाकले. त्यामुळे या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा दिला. त्यानुसार शुक्रवारी आत्मदहनासाठी चार कुटुंब जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. अलिबाग पोलीस निरीक्षक शैलेश सणस, पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी या कुटुंबाला प्रबोधन केले. त्रास देणाऱ्यांबाबत आपण लेखी तक्रार देऊन कायदेशीर कारवाई केली जाईल असेही पोलिसांनी या कुटुंबांना सागितले. त्यानुसार पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.