‘मन की बात’ : पंतप्रधानांना १९७५च्या आणीबाणीची आठवण

    देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज आकाशवाणीवरच्या (Doordarshan) ‘मन की बात’ (Mann Ki Baat) या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. या मालिकेचा आजचा ९० वा भाग होता. मन की बातच्या माध्यमातून पंतप्रधानानांनी देशातील आणीबाणीची (Emergency) परिस्थिती आणि युवकांवर संवाद साधला.

    पंतप्रधान म्हणाले, तुमचे आई-वडील तुमच्या वयाचे होते, त्यावेळी एकदा त्यांच्याकडून जगण्याचा अधिकारच काढून घेतला होता, हे तुम्हा मंडळींना माहिती आहे का? माझ्या नवतरूण मित्रांनो, आपल्या देशामध्ये मात्र, एकदा असे घडले होते. काही वर्षोंपूर्वी म्हणजेच, १९७५ सालची ही गोष्ट आहे. जून महिन्यात, म्हणजे याच काळात देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्यामध्ये देशातल्या नागरिकांचे सर्व अधिकार काढून घेण्यात आले होते.

    पुढे पंतप्रधान म्हणाले, घटनेतल्या कलम २१ अंतर्गत (Article 21) सर्व भारतीयांना ‘राइट टू लाईफ आणि पर्सनल लिबर्टी’ (Right to Life and Personal Liberty) म्हणजेच ‘जगण्याचा आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क मिळाला आहे. त्या काळी भारतातल्या लोकशाहीला पायदळी तुडविण्याचा प्रयत्न केला गेला. देशातली न्यायालये, प्रत्येक घटनादत्त संस्था, प्रकाशन संस्था-वर्तमानपत्रे, अशा सर्वांवर नियंत्रण, अंकूश लावण्यात आले होते. लावलेल्या सेन्सॉरशिपमुळे सरकारच्या स्वीकृतीविना काहीही छापणे, प्रसिद्ध करणे शक्य नव्हते.

    आणीबाणी संबंधित ते म्हणाले, मला आठवतेय, त्या काळामध्ये लोकप्रिय गायक किशोर कुमार यांनी सरकारची ‘वाहवाह’, करण्यास नकार दिला म्हणून त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती. त्या काळी हजारो लोकांना अटक केली गेली आणि लाखों लोकांवर अत्याचार केल्यानंतरही भारतातल्या लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास डळमळीत झाला नाही.

    भारतातल्या आपल्या लोकांवर अनेक युगांपासून जे लोकशाहीचे संस्कार झाले आहेत, सर्वांमध्ये लोकशाहीची भावना नसानसांमध्ये भिनली आहे. शेवटी त्याच भावनेचा विजय झाला. भारतातल्या लोकांनी लोकशाही पद्धतीनेच आणीबाणी हटवून, पुन्हा एकदा लोकशाहीची स्थापना केली. हुकूमशाहीच्या मानसिकतेचा, हुकूमशाहीच्या वृत्ती-प्रवृत्तीचा लोकशाहीच्या पद्धतीने पराभव केला जाणे, असे उदाहरण संपूर्ण जगामध्ये पहायला मिळणे अवघड आहे.