बेस्ट बस थांब्याचे होणार नूतनीकरण

मुंबईतील सर्वच बस थांब्यांचे 100 दिवसात नूतनीकरण होणार असल्याने प्रवाशांच्या बस थांब्यावर उभे राहण्याच्या आणि बसण्याच्या अडचणी सुटणार आहेत. यात दहा थांबे प्रायोगिक तत्त्वावर अत्याधुनिक करण्यात येणार असून त्यानंतर नूतनीकरण आणि विस्तारित सुखद प्रवासानुभव योजना राबवली जाणार आहे. त्यामुळे त्यानंतर अधिकाधिक थांबे हे अत्याधुनिक होणार असून या थांबांमुळे मुंबईच्या सुशोभीकरणात भर पडणार आहे.

    मुंबई : प्रवाशांच्या अडचणी सोडवण्यासाठी बेस्ट कडून नवनव्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्यातच जुने पुराने झालेले आणि गंजलेले असे सर्वच बस थांबे बदलून त्या ठिकाणी अत्याधुनिक प्रशस्त असे बस थांबे बेस्ट कडून लावण्यात येणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर असे दहा थांबे नव्याने तयार होणार असून त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, दिव्यांगांसाठी सांकेतिक ब्रेल फलक, वाहतुकीकडे झुकणाऱ्या आसन व्यवस्थेसह आधुनिक संरचना, सार्वजनिक शेअरिंग सायकलची सुविधा , रुंद बस रांग मार्गीका, वायफाय ,बस आगमन निर्देशक रंगीत छत, आरामदायक वातावरणासाठी प्रायोगिक क्षेत्रात धुके शीतकरण प्रणाली, एस ओएस पॅनिक बटन, संगीतासाठी ध्वनिक्षेपक ,यंत्रणा वाचनालय ३६० अंशातील दृश्य मानतेसाठी कडक आणि अखंड काचेचे पटल प्रथमोपचार पेटी अशा सुविधा या थांब्यांवर असणार आहेत.

    बेस्ट कडून याखेरीज २०० बस थांब्याचे सौंदर्यकरण आणि नूतनीकरण करण्यात येणार आहे. शासनाच्या डिजिटल भारत व्हिजनुसार ५० डिजिटल बस तांब्यांचे सौंदर्यकरणासोबत त्यावर माहिती दर्शक फलक लावण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना बस गाड्या संदर्भात माहिती मिळणे सोपे होणार आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर तीनशे दिवसात नूतनीकरण आणि विस्तारित सुखद प्रवासानुभव योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. यात २०० डिजिटल बस थांब्यांची सौंदर्यवर्धक व माहिती दर्शक फलकांमध्ये पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. त्यासोबत १००० बस थांबे पूरक व नव्या रचनेसहित सुधारित करण्यात येणार आहेत त्यासोबत योजनेत ५० डिजिटल बस थांब्यांचे सामूहिक दत्तक योजनेनुसार नूतनीकरण केले जाणार आहे