संदीप रेवडे सांगत आहेत ‘चुप’चा सेट तयार करताना आलेल्या आव्हानांविषयी

सनी देओल आणि दलकर सलमान यांच्या भूमिका असलेली आणि आर. बाल्की यांनी दिग्दर्शित केलेली चूप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट ही फिल्म सामान्य प्रेक्षकांना आणि समीक्षकांनाही आवडत आहे. या रहस्यमय थ्रिलरची कथा एका सीरियल किलरभवती फिरणारी आहे. हा खुनी दर शुक्रवारी येणाऱ्या फिल्म रिव्ह्यूजची वाट बघत असतो आणि त्यातील ज्या समीक्षकाशी जो सर्वांत जास्त असहमत असेल त्याचा खून करत असतो.

    समीक्षकाचा खून केल्यानंतर त्याची टिप्पणी तो समीक्षकाच्या मृतदेहावर कोरून ठेवत असतो. या फिल्मच्या अनोख्या सेटची रचना करणारे दुसरे तिसरे कोणी नसून ‘यह जवानी है दिवानी’, ‘बेबी’ व ‘पीके’ या फिल्म्ससाठी ओळखले जाणारे प्रोडक्शन डिझायनर संदीप रेवडे आहेत.

    सेट्स तयार कसे केले व सेट्स तयार करताना कोणती आव्हाने जाणवली याबद्दल संदीप म्हणाले, “प्रथम ही संकल्पना माझ्यासाठी खूपच रोचक होती. कारण, मी पहिल्यांदाच सायकोपॅथ थ्रिलर फिल्मसाठी सेट्स तयार करत होते. मला जे काही सांगण्यात आले होते त्यानुसार लोकांचे खून करण्याचा कलात्मक मार्ग दाखवायचा होता. कारण, यातील खुनी हा फिल्ममेकर आहे. त्यामुळे मी युटिलिटी म्हणून वेगवेगळ्या साधनांचा वापर केला.

    आम्ही काही माळीकामाची हत्यारे वापरली आणि आमचा खलनायक त्यांना धार कशी लावतो ते दाखवले. सर्व खुनांसाठी एकाच प्रकारची हत्यारे-साधने वापरण्याऐवजी प्रत्येक खुनासाठी वेगवेगळी हत्यारे-साधने निवडण्याची काळजी आम्ही घेतली. संपूर्ण फिल्मचा विचार करता या खूपच छोट्या गोष्टी होत्या पण यासाठी बारीक तपशिलांवर आम्ही खूप काम केले, खूप चर्चा केल्या. कारण, आम्हाला खुनी एक सुरा घेऊन सर्वांना मारत सुटला आहे असे दाखवायचे नव्हते, आम्हाला प्रत्येक खून वेगळ्या पद्धतीने दाखवायला होता आणि आम्ही हे करू शकलो याबद्दल मला आनंद आहे.”

    संदीपने फिल्ममधील बहुतेक सेट्स ओरिजिनल असतील याची काळजी घेतली आहे आणि दृश्य व त्यांची आवश्यकता बघता जागेचा खरा भास निर्माण करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केले आहेत. प्रत्येक नवीन फिल्मसोबत येणाऱ्या अपेक्षांहून अधिक चांगली कामगिरी कशी करायची हे संदीप रेवडे यांना चांगले माहीत आहे.