Shiv Sena's criticism on Raosaheb Danve

मुंबई : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावरुन राज्यात वातावरण तापले असून आज अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आली.

शेतकरी आंदोलन सुटा बुटातल्या लोकांचे असून त्यात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचे वादग्रस्त वक्तव्य भाजप  नेते रावसाहेब दानवे यांनी जालना जिल्ह्यात कोलते टाकली येथे केले होते.

दानवे यांच्या या वक्तव्यविरोधात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्यात येत आहे. पिंपरी चिचवड, औरंगाबाद, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, सोलापूर अशा अनेक जिल्ह्यात दानवे यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.

अकोला, तेल्हारा आणि अकोटमध्ये शिवसैनिकांनी रावसाहेब दानवे यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात आंदोलन करत गाढवाला दानवे यांची प्रतिमा बांधून निषेध केला आहे. भिवंडी बायपास येथे शिवसेना भिवंडी नेते करसन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली इंधन दरवाढ आणि रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनाबद्दल चुकीच्या वक्तव्य बद्दल निषेध मोर्चा करण्यात आला. यवतमाळच्या दत्त चौकात शिवसेनेकडून केंद्र सरकारचा निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी रावसाहेब दानवे यांच्या फोटोला चपला मारुन दानवे यांचा निषेध करण्यात आला आहे.

शेतकरी आंदोलनाचा संबंध चीन पाकिस्तानशी जोडणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत.  माजीमंत्री शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी आंदोलना दरम्यान दानवे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. दानवे  मनोरूग्ण   असून त्यांना आता झटके येत असल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे असल्याचे सांगत, दानवे यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला आहे.

जालना जिल्ह्यात बदनापूर येथे पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ खोतकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. लातूर शहरात रावसाहेब दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारुन दहन केले. तसेच केंद्र सरकार सत्तेवर आल्यापासून वरचेवर गॅस, डिझेल, पेट्रोल दरवाढ केल्यामुळे शेतकरी, व्यापारी, सामान्य वाहनधारक त्रस्त झाले आहेत. केंद्र सरकार विरोधात घोषणा देत यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद पिंपरी चिंचवडमध्ये ही उमटले. शिवसेनेने दानवे यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केले. शेतकऱ्यांना उद्देशून दानवे नेहमीच अवमानकारक भाष्य करत असतात. म्हणूनच त्यांना मंत्री पदावरून पायउतार करावे, अन्यथा शेतकरी भाजपला योग्य तो धडा शिकवतील, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.