बारा वर्षांच्या मनस्विनीने बनविले को-केअर ॲप; कोरोना उपचारादरम्यान होणार मदत

    कोपरगाव : कोरोना संकटात सगळेच हैराण झाले. उघड्या डोळ्याने तिनं हे सगळं बघितलं आणि ॲप बनविण्याची आयडिया सुचली. वय वर्ष १२. पण आपल्या तल्लख बुद्धीने या संकट काळात मदतीला येणार ऍप तिनं बनविले. मनस्विनी मंदार आढाव असं ऍप बनविणाऱ्या मुलीचं नाव. ऍप पाहून प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनीही तिच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली.

    कोपरगाव तालुक्यातील नागरिकांना कोविड आणि कोविड व्यतिरिक्त आजारांवर इत्यंभूत माहिती को-केअर ॲपचे माध्यमातून मिळणार आहे. त्यातून संभाव्य असलेल्या तिसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांना दिलासा मिळणार आहे. मनस्वी आढाव हिने को-केअर ॲपचे निर्मितीतून कोविड हाॅस्पिटल आणि रुग्णसेवेशी निगडित इतर माहितीचे नागरिकांना उपलब्ध केलेले दालन कौतुकास्पद असल्याचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी सांगितले. कोपरगाव तालुक्यातील मनस्वी मंदार आढाव या १२ वर्षांच्या लहान मुलीने कोपरगाव तालुक्यातील वैद्यकीय सेवेची माहिती देणारा KoCARE ॲप तयार केले आहे.

    ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर, मनस्वीची आजी प्रगतशील शेतकरी रंजना आढाव, आपत्ती व्यवस्थापन समन्वयक सुशांत घोडके, मंदार आढाव, जान्हवी आढाव, राजहंस आढाव यांच्या उपस्थितीमध्ये ऍपचे लोकार्पण झाले. मनस्वी ही कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष व मराठा पंच मंडळाचे अध्यक्ष ऍड.शंकरराव आढाव यांची नात असून, प्रसिद्ध उद्योजक वैभवराव आढाव यांची पुतणी आहे. या कामात मनस्वी हिला हैदराबाद येथील व्हाईट हॅट ज्युनिअर मार्गदर्शक शिक्षिका मोनिका सिंग, विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली बडदे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर, आपत्ती व्यवस्थापन समन्वयक सुशांत घोडके यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

    कोपरगाव तालुक्यातील नागरिकांना रुग्णसेवेसाठी ko CARE ॲप सेवा मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल मनस्वी हिचे कौतुक उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, तहसिलदार योगेश चंद्रे, कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव,शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते, भारतीय वैद्यकीय संघटना कोपरगाव शाखेचे अध्यक्ष डॉ.महेंद्र गोंधळी, सचिव डॉ.योगेश कोठारी यांचे सह नागरिकांनी अभिनंदन केले आहे.

    को केअर केअर ॲपमध्ये नियंत्रण कक्ष फोन नंबर, कोपरगाव तालुक्यातील कोविड रुग्णालय, तेथील फोन नंबर, कोविड व्यतिरिक्त इतर आजारांवर उपचार करणारे रुग्णालय, एच.आर.सी.टी. स्कॅन ठिकाण, रक्तपेढी, कोपरगाव रुग्णवाहिका माहिती, कोपरगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र यासह आरोग्य विषयक निगडित माहिती सदर ॲपमध्ये असणार आहे.