महामार्गावर दरोडा टाकणाऱ्या आरोपींकडून २५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; श्रीगोंदा पोलिसांची कारवाई 

    श्रीगोंदा / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : महामार्गावर गाड्या अडवून दरोडा टाकणारी टोळी श्रीगोंदा पोलिसांनी गजाआड केली. या टोळीकडून २५ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आर्यन शंकर कांबळे (रा. सांगवी, ता. फलटण, सातारा), संजय बबन कोळपे (रा.बोरी, श्रीगोंदा), गणेश श्रीमंत गिरी (रा. श्रीगोंदा कारखाना) आणि भाऊसाहेब गंगाराम पालवे (रा. श्रीगोंदा कारखाना) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

    उत्तर प्रदेश येथून तीस टन मक्याचे पोते घेऊन निघालेला ट्रक लोणी व्यंकनाथ येथे अडवून तो बाबुर्डी शिवारात नेण्यात आला. तेथे ट्रकमधील २५ टन मका बळजबरीने दुसऱ्या ट्रकमध्ये भरून आरोपी पसार झाले होते. श्रीगोंदा पोलिसांनी दौंड, काष्टी, मांडवगण, हंगेवाडी, मडेगाव परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करत नागरिकांकडे विचारपूस केली. त्यावेळी हा ट्रक काष्टी येथे पोलिसांच्या नजरेस पडला. त्यानंतर पोलिसांनी ट्रकसह आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पोलिस निरिक्षक रामराव ढिकले यांच्या पथकाने ही कामगिरी केली.