परमीट न घेताच ४०० रिक्षा रस्त्यावर; आरटीओने काढल्या जप्तीच्या नोटीसा

    अहमदनगर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : अहमदनगर शहरात ४०० रिक्षा परमीट नसतानाही रस्त्यावर धावत आहे. त्यामुळे अशा रिक्षावर आरटीओ विभागाने कारवाईचा बडगा उगारत जप्तीच्या नोटीसा धाडल्या आहेत. परमीट फी भरण्यासाठी रिक्षाचालकांनी मुदतवाढीची मागणी केली आहे.

    सप्टेंबर २०१७ मध्ये शासनाने रिक्षांसाठी परवाना खुला केला. त्यानंतर नगर शहरात सुमारे १ हजार ४०० रिक्षा नव्याने घेतल्या गेल्या. त्याची नोंदणी आरटीओ कार्यालयात करण्यात आली. मात्र, यातील केवळ १ हजार रिक्षामालकांनीच परमीट घेतले आहे. बाकीच्या ४०० रिक्षा परमीट न घेताच रस्त्यावर धावत आहेत. अशा रिक्षाचालकांना जप्तीच्या नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत.

    वाहतूक पोलीस व आरटीओ यांचे संयुक्त पथक रस्त्यावर थांबून रिक्षा परमीट तपासून पाहत असल्याने रिक्षाचालकांची धावपळ उडाली आहे.