राहुरीत ६१ लाखांचे चंदन पोलिसांनी पकडले; मोठी टोळी उघडकीस येण्याची शक्यता

    राहुरी : नगर-मनमाड महामार्गावर शिवाजीनगर येथे चंदन तस्करी आंतरजिल्हा टोळी पकडून अंदाजे ७० लाखांचे चंदन व मालवाहू टेम्पोसह दोघांना ताब्यात घेतले. श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने शनिवारी दुपारी ही धाडसी कारवाई केली. आरोपीविरोधी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यातून मोठी चंदन तस्करी टोळी हाती लागणार असल्याची शक्यता आहे.

    केरळ राज्यातील चंदन तस्कर टोळी राहुरी हद्दीतून बुऱ्हाणपूर मध्यप्रदेश येथे चोरीचे चंदन घेऊन जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर शिवाजीनगर येथील शिवाजी महाराज पुतळ्यासमोर चंदन वाहतूक करणारा टेंपो पोलिसांनी अडवून तपासणी केली असता त्यात ६५० किलो चंदन अंदाजे ६१ लाख रुपये किमतीचे व १० लाख रुपये किंमतीचा टेंपो असा ७१ लाखांचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला.

    चंदन तस्करी वाहतूक करणारे आरोपी अब्दुल मोहम्मद निसाद (वय ३२, रा. अंजामैल हाऊस ता. बैदाडका जिल्हा कासारगुड, केरळ) व अब्दुल फक्रुद्दीन रहमान (वय ४१, रा. अमितकला हाऊस  ता. ऐनमाकजा, जिल्हा कासारगुड, केरळ) यांच्याविरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन जि. अहमदनगर येथे प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करत आहे.