दोन लाखांची रोकड असलेली बॅग भरदिवसा लंपास; नगर-मनमाड रस्त्यावरील घटना

    नगर तालुका : दूध उत्पादकांचे दुधाचे पेमेंट देण्यासाठी डेअरीचालकाने बँकेतून काढलेली दोन लाख १५ हजारांची रक्कम असलेली बॅग स्कॉर्पिओ गाडीत ठेवली होती. मात्र, चार अज्ञात भामट्यांनी स्कॉर्पिओला धडक देऊन व हुज्जत घालत ती रक्कम असलेली ही बॅग लांबविल्याची घटना नगर-मनमाड रस्त्यावरील एस.जी.कायगावकर ज्वेलर्ससमोर मंगळवारी (दि.७) दुपारी १२.४५ च्या सुमारास घडली.

    याप्रकरणी कुंडलिक यादव देवकर (रा. मेहेकरी ता.नगर) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. देवकर यांची दूध डेअरी असून, दुध उत्पादक शेतकऱ्यांचे दुधाचे पेमेंट करण्यासाठी त्यांनी मंगळवारी (दि.७) दुपारी एकच्या सुमाराला नगर-मनमाड रस्त्यावरील ॲक्सिस बँकेतून दोन लाख १५ हजार रूपये रोख रक्कम काढली. त्यांनी ही रक्कम एका पिशवीत ठेवली व ती पिशवी स्कॉर्पिओ गाडीत पुढील सिटवर ठेवून ते स्वत: गाडी चालवत निघाले. मात्र, ते या रोडवरील एस. जी. कायगावकर सराफ दुकानाजवळ आले असता पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्या गाडीला दुचाकी आडवी लावून तुम्ही आमच्या एकाला धडक दिली असून, पळून जात होता काय अशी विचारणा करून हुज्जत घालण्यास सुरूवात केली.

    यावेळी देवकर गाडीमधून खाली उतरले असता, गाडीची दुसऱ्या बाजूची दरवाजाची काच उघडी राहिली. नेमकी त्याच बाजूला पैशाची पिशवी ठेवली होती. या संधीचा फायदा घेत इतर दोन इसम गाडीजवळ आले. त्यांनी काय झाले, अशी विचारणा केली. तसेच नजर चुकवून त्यांनी गाडीतील बॅग काढून घेऊन मनमाड रस्त्याने पोबारा केला. त्यानंतर हुज्जत घालणाऱ्या त्या दोन इसमांनीही तेथून पलायन केले. यावेळी देवकर हे परत गाडीमध्ये बसले असता त्यांना सीटवर ठेवलेली बॅग कोणीतरी पळविली असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला.

    या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे, तोफखाना पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. तसेच आरोपीच्या शोधार्थ दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. भरदिवसा चोरीचा प्रकार घडल्यामुळे एकच खळबळ आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे. या घटनेत चार आरोपींचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. दरम्यान, याप्रकरणी रात्री उशीरा देवकर यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.