विजेचा तीव्र झटका बसल्याने मुलगी जखमी; शेळी झाली ठार

मागील आठवड्यात चापेवाडी रस्त्यावर विजेच्या तारा पडल्याने विकास म्हस्के यांच्या गाईचा व कुत्र्याचा मृत्यू झाला होता. यावरून महावितरण कंपनी विद्युत वाहिन्यांबाबत हलगर्जीपणा करत असल्याचे दिसून येते.

    नगर तालुका / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : विजेचा शॉक लागल्याने मुलगी जखमी तर शेळी ठार झाल्याची घटना जेऊर येथे गुरुवारी घडली. यावेळी नागरिकांनी महावितरण कंपनीच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. जेऊर येथील लिगाडे वस्तीवर विद्युत वाहिनी तुटल्याने जमिनीवर पडली होती. तेथे शेळ्या चारणारी मुलगी चैत्राली भाऊसाहेब तोडमल (वय १२) हिला विजेचा झटका बसल्याने जखमी झाली तर एक शेळी तारेला चिकटल्याने जागेवरच मरण पावली.

    मागील आठवड्यात चापेवाडी रस्त्यावर विजेच्या तारा पडल्याने विकास म्हस्के यांच्या गाईचा व कुत्र्याचा मृत्यू झाला होता. यावरून महावितरण कंपनी विद्युत वाहिन्यांबाबत हलगर्जीपणा करत असल्याचे दिसून येते. विद्युत वाहिनी जमिनीवर पडलेली असताना याची कल्पना महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती. तरीही दोन दिवस त्या तारा जमिनीवरच पडून होत्या. त्यामध्ये विद्युत पुरवठा चालू असल्याने आजची दुर्घटना घडली.

    घटनास्थळी महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता सोनटक्के, माजी उपसरपंच बंडू पवार, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कराळे यांनी भेट देऊन पाहणी केली. तलाठी सुदर्शन साळवे यांनी घटनेचा पंचनामा केला. जखमी झालेल्या मुलीला व शेळी मरण पावल्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ मिळण्याची मागणी रविराज तोडमल, सोमनाथ तोडमल, अक्षय तोडमल, अनिल तोडमल, गणेश तोडमल, विलास जाधव, वैभव तोडमल, नंदू तोडमल यांनी केली आहे.