अकोले महाविद्यालयाच्या आयटी लॅबला भीषण आग ; सुमारे ६२ लाखांचे नुकसान

आयटी लॅबमध्ये असणारे ६२ संगणक ,सर्व्हर,लॅपटॉप,प्रिंटर,फर्निचर ,इन्व्हर्टर,बॅटरी, इलेक्ट्रॉनिक साहित्य,विभाग प्रमुख कार्यालयातील महत्वाची कागदपत्रे आदी जळून खाक झाले आहे. पहाटेच्या वेळी जवळच असलेल्या आयटीआय मैदानावर फिरण्यासाठी येणाऱ्या शेळके नावाच्या व्यक्तीने सर्वप्रथम ही आग लागल्याचे पाहिले.

    अकोले : अकोले (जि.नगर)येथील अकोले तालुका एज्युकेशन सोयायटीच्या अकोले महाविद्यालयाच्या आयटी लॅबला आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत लॅबचे तब्बल ६२ लाखांचे आर्थिक नुकसान झाले.

    या आयटी लॅबमध्ये असणारे ६२ संगणक ,सर्व्हर,लॅपटॉप,प्रिंटर,फर्निचर ,इन्व्हर्टर,बॅटरी, इलेक्ट्रॉनिक साहित्य,विभाग प्रमुख कार्यालयातील महत्वाची कागदपत्रे आदी जळून खाक झाले आहे. पहाटेच्या वेळी जवळच असलेल्या आयटीआय मैदानावर फिरण्यासाठी येणाऱ्या शेळके नावाच्या व्यक्तीने सर्वप्रथम ही आग लागल्याचे पाहिले.त्यानंतर महाविद्यालय प्रशासनाला ही माहिती समजली.त्यानंतर अगस्ति कारखान्याच्या अग्निशमन बंबला पाचारण करण्यात आले मात्र तोपर्यंत सर्व काही जळून खाक झाले.

    या आगीत सुमारे ६१ लाख १२ हजार ४०० रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती वस्तू आणि त्याच्या किंमतीसह या महाविद्यालय संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष जे.डी.आंबरे,सचिव यशवंत आभाळे,प्राचार्य डॉ.भास्कर शेळके तसेच संगणकशास्त्र विभागप्रमुख प्रा.के.एस.गुंजाळ आदींनी निवेदनाद्वारे पत्रकारांना दिली.

    या आगीचे कारण मात्र समजू शकले नाही मात्र ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.