दुर्दैवी ! झोपेतून उठून शौचालयासाठी बाहेर पडला अन् विजेचा शॉक लागून गेला…

    जामखेड : पहाटे सहा वाजता उठून शौचालयासाठी घराबाहेर जात असताना घराबाहेर पडलेल्या विजेच्या तारा पाहण्यात न आल्याने युवक ताराला चिटकला. त्याच्या ओरडण्याने वडील व मोठा भाऊ यांनी त्याला ओढण्याचा प्रयत्न केला असता त्या दोघांना शाँक बसून जखमी झाले. ही घटना वंजारवाडी येथे पहाटे सहा वाजता घडली. याबाबत जामखेड पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, योगेश बळीराम जायभाय (वय २३ रा. वंजारवाडी ता. जामखेड) हा पहाटे सहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे उठून शौचालयाला चालला असता घराजवळील विद्युत खांबावरील तार तुटून खाली पडली होती. ती त्यास दिसली नसल्याने त्याचा तारेवर पाय पडल्याने त्याला शॉक बसला. त्यानंतर तो मोठमोठ्याने ओरडला. त्यावेळी त्याचे वडील बळीराम जायभाय व भाऊ गोकुळ यांना त्याला ओढण्याचा प्रयत्न केला असता त्या दोघांना विद्युत शॉक बसला व तेही खाली पडले.

    यावेळी वडील बळीराम हे बेशुद्ध पडले. तर भाऊ गोकुळ याचा हात भाजला. त्यावेळी शेजारील राहणारे नातेवाईक यांनी दोरीच्या साह्याने तार बाजुला करून योगेश याला बाजूला करून जामखेड येथील ग्रामीण रूग्णालयात आणले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

    वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ यांनी मयत योगेशचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह दिला. दुपारी उशीरा वंजारवाडी येथे मयत योगेश जायभाय याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गुरूवारी वंजारवाडी व परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता. योगेशेच्या अपघाती निधनाने वंजारवाडी व पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.