कर्हे घाटात अपघात; खाजगी बस पलटल्याने चौघे जखमी

पुणे-नाशिक महामार्गावर कर्हे घाटाजवळ प्रवाशांना घेऊन जाणारी ट्रॅव्हल बस पलटी झाल्याने अपघात झाला. या अपघातात चार जण जखमी झाले

    संगमनेर : तालुक्यातील नाशिक-पुणे महामार्गावर गुरुवारी पहाटेच्या सुमारास ट्रॅव्हल बसचा अपघात झाला. यात अपघातग्रस्त वाहनांमधील सर्व प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले चौघे प्रवासी जखमी झाले आहेत.

    याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावर कर्हे घाटाजवळ प्रवाशांना घेऊन जाणारी ट्रॅव्हल बस पलटी झाल्याने अपघात झाला. या अपघातात चार जण जखमी झाले असून, जखमींना संगमनेरच्या खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. ट्रॅव्हल क्रमांक (एमएच 04 7865) प्रवाशी घेऊन संगमनेरच्या दिशेने येत होती. घाटात बस येताच चालक शिवदास भिकाजी आव्हाड यांचं बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

    अपघाताची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार, पोलीस नाईक नितीन शिंदे, पोलीस नाईक ओंकार शेंगाळे, पोलीस नाईक अनिल जाधव, पोलीस नाईक विष्णू आहेर, सहाय्यक फौजदार सय्यद यांसह इतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. सर्व प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. तसेच क्रेनच्या सहाय्याने तात्काळ अपघातग्रस्त वाहन बाजूला करण्यात आले. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.