गाईंची चोरून कत्तल करणाऱ्या आरोपींकडून कुटुंबियांच्या जीवाला धोका

मतीन सय्यद यांचे जिल्हा पोलीस अधिक्षकांना दिले निवेदन
अहमदनगर: गाई चोरीप्रकरणी पोलिसांना माहिती दिल्याचा संशय घेऊन भिंगार सदरबाजार येथील कुरेशी कुटुंबीयांनी राष्ट्रवादीचे शहर जिल्हा संघटक मतीन सय्यद यांच्या भाच्यास जबर मारहाण करुन सय्यद यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मारहाण करुन धमकाविणार्‍या गुन्हेगार प्रवृत्तीच्या आरोपींना त्वरीत अटक करुन त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन पोलीस अधिक्षक कार्यालयात देण्यात आले. यावेळी मतीन सय्यद, आतीक शेख, मुस्तकीम शेख, आकिब शेख,अमान शेख, शहबाज शेख, कलीम शेख, मूईज शेख, अलीम शेख, नईम शेख आदी उपस्थित होते.      

भिंगारमध्ये मागील सहा ते सात महिन्यापासून गाई चोरी करणारी टोळी सक्रिय झाली आहे. ते बिनधास्त राजरोसपणे गाया चोरून त्यांची कत्तल करीत आहे. तर चोरलेल्या गाईचे मासची अनाधिकृतपणे विक्री केली जात आहे. भिंगार येथील सदर बाजार पोस्ट ऑफिसमागे पत्र्याच्या शेडमध्ये गो हत्या चालू असून, गो मास विक्रीचा व्यवसाय चालू आहे. हा अनाधिकृत व्यवसाय करणारे कोणालाही घाबरत नसून, गुंड प्रवृत्तीचे लोक असल्याने त्यांच्या विरोधात तक्रार करण्यास कुणीही पुढाकार घेत नाही.

-मोक्का अंतर्गत कारवाई करावी
राष्ट्रवादीचे शहर जिल्हा संघटक मतीन सय्यद यांनी गाई चोरीप्रकरणी पोलीसांना माहिती दिल्याचा सदरबाजार येथील कुरेशी कुटुंबीयांच्या मनात राग आहे. ३ ऑगस्ट ला पोलिसांनी भिंगारला छापा टाकला असता त्यांना गो हत्या झाल्याचे आढळून आले व संबंधीतांवर कारवाई करण्यात आली. सदर प्रकरणाचा राग धरुन कुरेशी कुटुंबीयांनी सय्यद यांचा भाचा मोईज शेख याला जबर मारहाण केली. तर सय्यद यांना जीवे मारण्याची धमकी भाच्याला दिली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. आरोपी असलेल्या व्यक्तींवर अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. गाई चोरीचे गुन्हे दाखल असताना ते मोकाट फिरत आहे. अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून संपुर्ण कुटुंबीयांस धोका असून, त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अन्यथा (दि.१०) ऑगस्ट पासून पोलीस अधिक्षक कार्यालया समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.