डेंग्यूचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासन सज्ज; एक दिवस कोरडा पाळण्याचे आवाहन

    अहमदनगर : संसर्गजन्य डेंग्यू आजार रोखण्यासाठी घरातील पाणीसाठे सात दिवसांपेक्षा जास्त काळ ठेवू नयेत. गावामध्ये पाणीपुरवठा विभागाच्या सहकार्याने आठवड्यातील एक दिवस संपूर्ण कोरडा दिवस पाळण्यात यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आणि जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके यांनी केले आहे.

    डेंग्यू हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. डेंग्यू तापाचा प्रसार हा स्वच्छ पाण्याच्या साठयामध्ये उत्पत्ती होणाऱ्या एडिस ईजिप्ताय डासापासून होतो. अचानक येणारा तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, सांधेदुखी, अंगदुखी इ. तोंडाची चव जाणे, मळमळ व उलटया होणे. शरिरावर लाल पुरळ येणे, हिरड्यातून व नाकातून रक्तस्त्राव होणे अशी लक्षणे आहेत. वाढती डासोत्पत्ती स्थाने, एडिस डासांची वाढती घनता, परंपरागत पाणी साठ्याची सवय व पद्धती, स्वच्छतेचा अभाव, वाढती लोकसंख्या व राहणीमान, दूषित रुग्णांचे स्थलांतर, डासांच्या किटकनाशक प्रतिकार शक्तीत वाढ अशी त्याच्या वाढीचे कारणे आहेत. आपल्या घरचा परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन साळुंके यांनी केले आहे.

    डासोत्पत्ती स्थाने निर्माण न केल्यास डास निर्माण होणार नाहीत. त्यामुळे हिवताप व डेंग्यूसारखे आजार होणार नाहीत. याची दक्षता घेतल्यास डेंग्यू तापाचा प्रसार आपल्या गावात, शहरात होणार नाही, यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

    अशी घ्या काळजी…

    घरातील पाणी साठ्याच्या टाक्या, फ्रिज, कुलर, कुंड्या आदींमधील पाणी प्रत्येक सात दिवसांनी बदलावे. घराभाेवती पाणी साठणाऱ्या टाकाऊ वस्तू, पत्र्याचे डबे, नारळाच्या करवंटया, रिकामे टायर्स, रिकामे शहाळे, फुटक्या बाटल्या, खड्डे इ. डासोत्पत्ती स्थाने त्वरीत नष्ट करावीत.

    या उपाययाेजना करा…

    डासोत्पत्ती स्थानांवर नियंत्रण राखण्यासाठी डासोत्पत्ती स्थानांमध्ये डासअळी भक्षक गप्पी मासे सोडावेत. यासाठी नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डासअळी भक्षक  गप्पी मासे मोफत उपलब्ध आहेत. डासांपासून व्यक्तिगत संरक्षणासाठी नागरिकांनी पूर्ण बाह्याचे कपडे, डास प्रतिबंधक अगरबत्ती, मलम, मच्छरदाणीचा वापर करावा, गच्चीवरील  व जमिनीवरील पाण्यांच्या टाक्यांची झाकणे घट्ट लावावीत, सेप्टी टँकच्या व्हेंट पाईपला वरच्या बाजुला नॉयलॉन जाळी अथवा सुती फडके बांधावे.