…तर आपण कोरोनाचा यशस्वी सामना करू; डॉ. भोसले

    राहुरी : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत मुलांना संसर्गाची भीती असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी, संसर्ग झाला तर कशाप्रकारे उपाययोजना करावी, याबाबत जिल्ह्यातील बालरोगतज्ज्ञांच्या माध्यमातून ग्रामीण स्तरापर्यंत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील नियोजन तयार करुन त्याची अंमलबजावणी येत्या काही दिवसांत सुरु करण्यात येणार असल्याची माहिती नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

    लहान मुलांमधील कोरोना संसर्ग टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनासंदर्भात नेमलेल्या जिल्हास्तरीय बालरोगतज्ज्ञ टास्क फोर्स समितीची गुरुवारी बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एन. दहिफळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. स. वि. सोलाट, डॉ. पालेकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. गणेश मिसाळ, डॉ. जयदीप देशमुख, डॉ. सुचित तांबोळी, डॉ. आशिष कोकरे, डॉ. चेतना बहुरुपी यांच्यासह भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

    प्रशासनाने सर्वतोपरी तयार असावे : डॉ. भोसले

    सध्या दुसऱ्या लाटेत रुग्णवाढ मोठ्या झपाट्याने वाढली. संसर्गाचा वेग जास्त होता. तरुणांबरोबरच मुलांनाही काही प्रमाणात संसर्ग झाल्याचे आढळून आले. मात्र, संभाव्य तिसऱ्या लाटेत संसर्गाचा धोका लहान मुलांना जास्त असल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन म्हणून आणि आरोग्य यंत्रणा म्हणून आपण त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्वतोपरी तयार असले पाहिजे. लहान मुलांनी काय काळजी घ्यावी, त्यांच्या पालकांनी काय काळजी घ्यावी, लक्षणे आढळल्यास उपचारपद्धती, त्यासाठी तालुकास्तरावरील यंत्रणांची तयारी आदीबाबत डॉ. भोसले यांनी या बालरोगतज्ज्ञांनी तपशीलवार चर्चा केली.

    …तर आपण कोरोनाचा यशस्वी सामना करू

    जिल्ह्यात शासकीय रुग्णालयांमध्ये बालरोगतज्ज्ञांची पुरेशी संख्या नाही. त्यामुळे भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या अहमदनगर जिल्हा शाखेने पुढाकार घेऊन याकामी प्रशासनाबरोबर हातात हात घालून सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. संभाव्य कोरोना संसर्गाची लाट वेळीच थोपविली आणि त्याबाबतची पूर्वकाळजी घेतली गेली तर आपण त्याचा यशस्वी सामना करु शकू, असे त्यांनी यावेळी सांगितले.