महाराष्ट्र साहित्य परिषदेत अहमदनगरचा सन्मान; यशवंतराव गडाख विश्वस्त

    अहमदनगर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीमध्ये अहमदनगरला मानाचे स्थान मिळाले आहे. कार्यकारिणीच्या विश्वस्तपदी ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख आणि विभागीय कार्यवाहपदी जयंत येलुलकर यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली म.सा.प.पुणेच्या रविवारी झालेल्या कार्यकारिणी सभेमध्ये अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. याच कार्यकारिणीत नगरच्या दोघांचा समावेश झाला.

    अहमदनगरमधील सावेडी उपनगर शाखेचे प्रमुख कार्यवाह असलेले येलुलकर यांनी जिल्हयातील साहित्य चळवळ वाढविण्यासाठी अनेक उपक्रमांचे आयोजन केले आहे. अहमदनगर येथे सावेडी शाखेने प्रतिष्ठेचे विभागीय साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केले होते. सावेडी उपनगर शाखेचे अध्यक्ष उद्योगपती नरेंद्र फिरोदिया स्वागताध्यक्ष असलेले हे संमेलन विविध साहित्य कार्यक्रम, महाराष्ट्रातील असंख्य साहित्य रसिकांचा प्रतिसाद व सुयोग्य नियोजनामुळे साहित्य क्षेत्रात मानाचे पान ठरले आहे. दोन वर्षांपूर्वी शाखेने हजारो विद्यार्थ्यांच्या सहभागाने आयोजित केलेले विद्यार्थी साहित्य संमेलन ऐतिहासिक ठरले होते. येलुलकर यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मॅनेजिंग कमिटीवर असताना आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. पुण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीमध्ये त्यांनी आपले मोलाचे योगदान दिले असून बी. सी. सी. आयचे तत्कालीन अध्यक्ष शरद पवार यांनी येलुलकर यांना यासाठी खास सन्मानित केले होते.

    येलुलकर यांच्या निवडीबद्दल त्यांचा फ्रेंड्स फॉरएव्हर ग्रुपच्या वतीने शब्दगंध साहित्य परिषदेचे नगर अध्यक्ष राजेंद्र उदागे, माजी नगरसेवक संपत नलावडे, श्रीनिवास बोज्जा आणि ‘नवराष्ट्र’चे अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी संदीप रोडे, बबनराव साबळे यांनी सत्कार करत शुभेच्छा दिल्या.