आबा, भाऊ, ताई अन् लेक जावई!

  अहमदनगर/संदीप रोडे :  अहमदनगर जिल्हा परिषदेची सभा अभ्यासू व्यक्तिमत्व आणि विखे पाटलांचे मेहुणे आबा म्हणजेच राजेश परजणे यांच्या अभ्यासू भाषणाने सभागृहात प्रशासनाच्या कार्य कुशलतेचा बुरखा फाडला गेला. त्यांच्या अभ्यासू भाषणाला सदस्या हर्षदाताई काकडे यांनी साथ देत अध्यक्षा राजश्री घुले यांच्या लेक-जावयाचा उल्लेख कोपरगांव तालुक्यावरील अन्यायाला वाचा फोडली.
  व्यासपीठावर असलेले भाऊ म्हणजे मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू सुनील यांनी त्याला उत्तर देत सत्ताधारी पक्षाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.

  दीड वर्षानंतर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा पहिल्यांदाच ऑफलाईन झाली. त्याचा फायदा घेत आपल्या गटातील अनेक प्रश्न मांडून ते सोडविण्याची संधी सदस्यांना होती. मात्र, बहुतांश सदस्य मौनात असल्याचे दिसले. लसीकरणाच्या विषयावर मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्ह्यावर अन्याय केल्याची ओरड सभागृहात झाली. मात्र, त्यांचे समर्थक सदस्य अजय फटांगरे व इतरांनी त्यावर ‘आमचे नियोजन’ हे कारण देत मंत्री थोरात जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचे नेते हे सभागृहात रेटून सांगितले.

  जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून रुग्णवाहिका मिळाल्या. मात्र, त्याच्या लोकार्पण सोहळ्याचे मानापमान नाट्य सभागृहासमोर आले. आमच्या गटात लोकार्पण सोहळा होत असताना जिल्हा परिषद सदस्यला साधी कल्पनाही दिली गेली नाही. हे चुकीचे असल्याचे राजेश परजने यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. मुख्याधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी त्यावर खुलासा करत जिल्हा पातळीवर लोकार्पण सोहळा झाला. तालुक्यात माहित नाही, असं सांगितलं. त्यानंतर शिक्षकांच्या प्रश्नावर आबा तावातावाने सभागृहात बोलले. त्यांचं आणि शिक्षकांचं कुठं बिनसलं हे कळलं नसलं तरी त्यांचं म्हणणं योग्य होतं.

  जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या अनेक सोसायट्या आहेत. त्या सभासदांना कर्ज देतात मात्र त्यांच्या कर्जाची परतफेड जिल्हा परिषद प्रशासन फुकटात करून देते. कर्जदार सभासदाच्या पगारातून हप्ता कट करून तो बँक सोसायटीला भरला जातो. त्याबदल्यात प्रशासनाला काय मिळते?, प्रशासनाचा स्टेशनरी, कार्यालयीन खर्च आणि वेळही जातो. तसा कुठला नियम नाही तरीही प्रशासन त्यांच्यावर मेहरबान. तीन वर्षापासून हा प्रश्न सभागृहात येतो, मात्र त्यावर काहीच निर्णय होत नसल्याची खंत आबांनी व्यक्त केली. आबा सदस्य असलेल्या कोपरगाव तालुक्यात जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले यांचा जावई आमदार आहे. त्यांची कन्या चैताली या कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्या पत्नी आहेत.

  लेक-जावई कोपरगावात असतानाही तालुक्याला जिल्हा परिषदेकडून झुकते माप मिळत नाही, अशी खंत आबांनी नोंदविली. त्याला हर्षदा काकडे यांनी साथ दिली. त्यानंतर ताईंनी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रमुखाच्या कर्तृत्वाची ”(कार्यालयात उपस्थित नसल्याची) सभागृहात काढली. कार्यालयात ते सदस्यांच्या कामावेलीच उपस्थित नसतात असे सांगत त्यांनी नाराजी नोंदवली. मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू सुनील भाऊ यांनी जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या निधीचा खर्च परस्पर केला जातोय. हा अधिकारावर अतिक्रमण असल्याचा मुद्दा उपस्थित केला.

  नवलेंची चारोळी अन् हास्याची लकेर…

  जिल्हा परिषद सभागृहाचे काही नियम आहेत. त्याकडे दुर्लक्ष करत नवनागापूर निंबळक ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अध्यक्षांच्या परवानगीविना सभागृहात बसले. ही बाब निदर्शनास येताच आबांनी संकेताचे पालन केले जावे, असा मुद्दा उपस्थित करत नाराजी नोंदवली. आबा पोटतिडकीने प्रश्न मांडत असताना कर्मचारीमध्ये-मध्ये लुडबुड करत होते. त्यावरूनही आबा संतप्त झाले. आबांच्या अभ्यासू भाषणासोबतच शिवसेनेचे सदस्य संदेश कार्ले यांनीही मुद्देसूद भाषणातून सभागृहाचे लक्ष वेधले. जिल्हा परिषदेचे माजी सभापती व विद्यमान सदस्य शरद नवले यांनी प्रत्येक सदस्य, अधिकारी आणि पत्रकारांच्या नावावर कोटी करणारी मिश्किल चारोळी सादर करत काही वेळ हास्य फुलविले.