…अन् जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकच निघाला वाळू तस्कर

पारनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक वाळू तस्करी करत असल्याचा धक्कादायक उल्लेख पारनेर तहसीलदारांनी राज्य महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीत केला आहे.

    अहमदनगर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : पारनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक वाळू तस्करी करत असल्याचा धक्कादायक उल्लेख पारनेर तहसीलदारांनी राज्य महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीत केला आहे. हे शिक्षक तीन वर्षात कधीही शाळेवर गेले नाहीत. या प्रकरणाची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी तहसीलदार ज्योती देवरे यांनी केली आहे.

    जिल्हा गौण खनिज अधिकारी व लिपिक यांना भाळवणी कोविड सेंटरमध्ये झालेल्या मारहाणीत या शिक्षकांचाही समावेश असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हे प्राथमिक शिक्षक शालेय कामकाज करत नाही, याची माहिती पारनेरचे गटविकास अधिकाऱ्यांना असतानाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई ते करत नाहीत. पोलीस अधिकाऱ्यांसमोर लोकप्रतिनिधी कायदा हातात घेतात. हा प्रकार महिला तहसीलदारांना तणावाखाली ठेवणारा असून याची चौकशी होऊन पोलिस निरीक्षक व गटविकास अधिकारी यांच्यावर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी देवरे यांनी या तक्रारीत केली आहे.

    प्रांताधिकाऱ्यांमार्फत दबाव

    प्रांत अधिकारी सुधाकर भाेसले यांच्यामार्फत तहसीलदारांवर खोट्या अ‍ॅट्रॉसिटीचा दबाव आणण्यात आला. कार्यालयातील काही लिपिक लोकप्रतिनिधींना तहसीलदाराची माहिती पुरवितात. तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी तहसीलदारांविरोधात तक्रार अर्ज दिले आहेत. हा तक्रार अर्ज देणाऱ्यांमध्येही आणखी एका प्राथमिक शिक्षकांच्या नावाचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. हे शिक्षक शिस्तभंग विषयक वर्तन करत ते कधीही शालेय गावात राहत नसल्याचा उल्लेख तक्रारीत आहे.

    वरिष्ठांचीही नावे

    राज्य महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीत महसूल विभागातील वरिष्ठांचींही नावे आहेत. तालुक्याचे आमदार, प्रांताधिकारी सुधाकर भाेसले, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, अरुण रोडे, अरुण आंधळे, धोंडीबा शेटे या व्यक्ती प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या अडथळा आणून मानसिक स्वास्थ्य व कामकाजावर परिणाम करत आहे, असा उल्लेख या तक्रारीत असून मदतीची याचना राज्य महिला आयोगाकडे पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी केली आहे.