अकोलेच्या बीजमाता राहीबाई सोमा पोपेरे यांची राष्ट्रीय समितीवर निवड

मी प्रत्यक्ष वर्गात जाऊन शाळा शिकू शकले नाही .त्याला माझी गरिबी आणि कौटुंबिक परिस्थिती कारणीभूत होती. परंतु माझ्याकडे अभ्यास करण्यासाठी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ ,विद्यार्थी ,अभ्यासक येत असतात हाच माझ्या कार्याचा खरा गौरव आहे .विद्यार्थी आणि अभ्यासकांना मदत करणे हे मला मनापासून आवडते. आणि मी ते करत राहील असे त्या नेहमी अभिमानाने सांगतात .

    अकोले : बीजमाता म्हणून देशभर प्रसिद्ध असलेल्या अकोले(जि.नगर) तालुक्यातील कोंभाळणे येथील पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांची राष्ट्रीय पातळीवरील भारत सरकार कृषी मंत्रालयातर्फे स्थापन करण्यात आलेल्या प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटीज अँड फार्मर्स राईट ॲक्ट १०१२अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील निवड समितीवर निवड करण्यात आली आहे.त्यांच्या निवडी संदर्भातील ई-मेल नुकताच प्राप्त झालेला आहे अशी माहिती बायफचे विभागीय अधिकारी जितीन साठे यांनी आज सायंकाळी अकोले येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

    डॉक्टर टी. के .नागरत्ना रजिस्टार प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटीज अँड फार्मर्स राईट ॲक्ट कृषी विभाग, भारत सरकार यांनी या निवडीचे पत्र पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांना पाठवलेले आहे.या समिती मार्फत देशपातळीवर पारंपारिक बियाणे संवर्धन निर्मिती संगोपन व प्रचार प्रसार करणाऱ्या व्यक्ती ,संस्था ,मंडळ व समित्या ,यांची निवड राष्ट्रीय पातळीवर देण्यात येणाऱ्या पुरस्कारांसाठी करण्यात येते. देशातील उत्कृष्ट बीज संवर्धक निवडण्याची जबाबदारी या समितीवर असते. देशपातळीवर दरवर्षी सुमारे 85 लाख रुपये किमतीचे पुरस्कार या समितीच्या माध्यमाने निवडण्यात आलेल्या शेतकरी , संस्था व व्यक्तींना दिले जातात. देशपातळीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात पुरस्कारांचे वितरण व रक्कम याच विभागामार्फत केली जाते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अकोले तालुक्याचे नाव चमकवलेल्या बीजमाता राहीबाई सोमा पोपेरे यांची या समितीवर निवड होणे म्हणजे तळागाळात काम करणाऱ्या गरीब हातांना मिळालेला न्याय म्हणता येईल. अशी भावना सामाजिक स्तरातून व्यक्त होत आहे. या अगोदरही राष्ट्रीय पातळीवर राहीबाई यांनी केलेल्या गावरान बीज संवर्धनाची दखल घेत भारत सरकारने त्यांना नारीशक्ती आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांच्या कार्याचे महत्व व आवश्यकता लक्षात घेऊन तसेच त्यांचे या विषयातील पारंपारिक ज्ञान व त्यावर असलेले प्रभुत्व यांचा विचार करून या समितीवर त्यांची निवड करण्यात आली आहे. राहीबाई यांनी सांगितल्याप्रमाणे मी निसर्गाच्या शाळेत शिकले आहे .मी प्रत्यक्ष वर्गात जाऊन शाळा शिकू शकले नाही .त्याला माझी गरिबी आणि कौटुंबिक परिस्थिती कारणीभूत होती. परंतु माझ्याकडे अभ्यास करण्यासाठी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ ,विद्यार्थी ,अभ्यासक येत असतात हाच माझ्या कार्याचा खरा गौरव आहे .विद्यार्थी आणि अभ्यासकांना मदत करणे हे मला मनापासून आवडते. आणि मी ते करत राहील असे त्या नेहमी अभिमानाने सांगतात . अशाप्रकारे राष्ट्रीय पातळीवरील समितीमध्ये महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पुरस्कार निवड समितीत काम करण्याचा मान मिळालेल्या शेतकरी व आदिवासी समाजातील राहीबाई या पहिल्या महिला ठरल्या आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल बायफ संस्थेचे अध्यक्ष गिरीश सोहोनी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या निवडीबद्दल बायफचे रिजनल डायरेक्टर व्ही. बी. द्यासा , राज्य समन्वयक सुधीर वागळे, अतिरिक्त राज्य समन्वयक, प्रदीप खोशे, विषय तज्ञ संजय पाटील, डॉक्टर विठ्ठल कौठाळे , योगेश नवले, या मान्यवरांनी विशेष अभिनंदन केले आहे.