राज्यातील सर्व शाळा सुरू करण्याची परवानगी द्या; पद्मश्री पोपटराव पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ग्रामीण भागात ऑनलाईन अभ्यासक्रमात इंटरनेट व त्या अनुषंगिक इतर सोयीसुविधा नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे आणि त्यातून मुलांचे व पर्यायाने त्या कुटुंबाचा भविष्यकाळच अंधकारमय होण्याची भीती आहे.

    अहमदनगर: कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंद असलेले प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुरु करणेबाबत पद्मश्री पोपटराव पवार यांनी नुकतेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार,शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड , राज्यमंत्री बच्चु कडू यांना निवेदन दिले आले.
    हिवरे बाजार हे राज्यातील पहिले गाव कोरोनामुक्त झाले आहे.विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थी,पालक,शाळा व्यवस्थापन समिती,शिक्षक व ग्रामपंचायत यांनी स्वत:च्या जबाबदारीवर १५ जून २०२१ पासून इ. ५ ते ७ वी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व इ.८ ते १० यशवंत माध्यमिक विद्यालय सुरु केलेले आहे.
    हिवरे बाजार हे गाव १५ मे २०२१ रोजी कोरोनामुक्त झाले त्यात कोरोना सुरक्षा मुख्य समितीत फ्रंटलाईन वर्कर म्हणून प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील शिक्षक काम करत होते त्यामुळे विद्यार्थी व पालक यांचेशी शिक्षकांचा संवाद चालूच होता त्यातूनच दिनांक १६ मे ते ३० मे या कालावधीत प्रत्यक्षात शाळा सुरु करणेबाबत विद्यार्थी व पालक सर्वे करून प्रत्यक्षात चर्चा केली आणि त्यांचे मत जाणून घेतले.त्यातुन असे लक्षात आले की विद्यार्थी लिखाण वाचन विसरूनच गेलेले आहेत.यातून ग्रामीण भागात ऑनलाईन अभ्यासक्रमात इंटरनेट व त्या अनुषंगिक इतर सोयीसुविधा नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे आणि त्यातून मुलांचे व पर्यायाने त्या कुटुंबाचा भविष्यकाळच अंधकारमय होण्याची भीती आहे. आपल्याला कोरोना बरोबरच रहायचे आहे हे लक्षात आल्यामुळे प्रथमतः शिक्षकांची तदनंतर पालकांची व ग्रामपंचायत कोरोना सुरक्षा समितीची बैठक घेऊन हिवरे बाजार येथील विद्यार्थी, पालक,शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत यांनी कोरोनाविषयक जबाबदारी स्वीकारली आणि शिक्षकांनी अध्यापनाचे काम करण्याची जबाबदारी स्वीकारून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.
    गावे,वाडया वस्त्या व पाडे यामध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला नाही तसेच ज्या गावात कोरोना आला परंतु उत्तम नियोजनातून कोरोना मुक्त गाव करण्यात आली अशा ठिकाणी कोरोनाविषयक जबाबदारी पालक,शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत यांनी घेतल्यास जिल्हा परिषदेच्या संबिधीत विभागामार्फत परिस्थितीची खातरजमा करून शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात यावी हि विनंती करण्यात आली आहे.