रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे आंबीदुमाला ग्रामस्थ संतप्त ; खडीवरून घसरून होतोय दुचाकीस्वारांचा अपघात 

सध्या खडीकरणाचे काम झाले असून डांबरीकरणापूर्वीच ठिकठिकाणी रस्ता उखडला आहे. आंबीदुमाला येथे मोठ्या प्रमाणात खडी निघाली आहे. या खडीवरून अनेक दुचाकीस्वार घसरून पडत आहे. यामुळे ग्रामस्थ चांगलेच संतप्त झाले आहे. तत्पूर्वी डांबरीकरण करण्यापूर्वीच रस्त्यावरील खडीही निघाल्याने संबंधित विभागाचे अधिकारी नेमके करतात तरी काय? असा संतप्त सवालही सावकार शिंदे, शैलेश शिंदे, विष्णू ढेरंगे, रामदास नरवडे, महादू राखुंडे, मारूती ढेरंगे, देवराम देसले, तुषार ढेरंगे, गणपत नरवडे, नवनाथ नरवडे आदी ग्रामस्थांनी केला आहे.

    संगमनेर : संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील आंबीफाटा ते आंबीदुमाला रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून चालू असून सध्या खडीकरण झाले आहे. मात्र डांबरीकरण होण्यापूर्वीच ठिकठिकाणी रस्त्यावरील खडी निघाली आहे. यामुळे अनेक दुचाकीस्वार यावरून घसरून पडत असल्याने ग्रामस्थ चांगलेच संतप्त झाले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर अपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

    आंबीफाटा, आंबीदुमाला ते म्हसवंडी हा रस्ता नागरिकांच्या दररोजच्या रहदारीचा आहे. या रस्त्यावरुन वाहनांची देखील नेहमीच वर्दळ असते. दोन-तीन वर्षांपूर्वी या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली होती, ठिकठिकाणी खड्डे पडले होते. त्यामुळे याचा नाहक त्रास नागरिकांसह विद्यार्थ्यांनाही सहन करावा लागत होता. रस्त्याचे लवकरात लवकर काम व्हावे म्हणून संबंधित विभागाकडे दोन्ही गावच्या नागरिकांनी पाठपुरावा केला. आणि त्यानंतर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्याचे काम मंजूर झाले. त्यातही संबंधित ठेकेदाराने अतिशय धिम्या गतीने काम करण्यास सुरुवात केली आहे.

    सध्या खडीकरणाचे काम झाले असून डांबरीकरणापूर्वीच ठिकठिकाणी रस्ता उखडला आहे. आंबीदुमाला येथे मोठ्या प्रमाणात खडी निघाली आहे. या खडीवरून अनेक दुचाकीस्वार घसरून पडत आहे. यामुळे ग्रामस्थ चांगलेच संतप्त झाले आहे. तत्पूर्वी डांबरीकरण करण्यापूर्वीच रस्त्यावरील खडीही निघाल्याने संबंधित विभागाचे अधिकारी नेमके करतात तरी काय? असा संतप्त सवालही सावकार शिंदे, शैलेश शिंदे, विष्णू ढेरंगे, रामदास नरवडे, महादू राखुंडे, मारूती ढेरंगे, देवराम देसले, तुषार ढेरंगे, गणपत नरवडे, नवनाथ नरवडे आदी ग्रामस्थांनी केला आहे.

    आंबीदुमाला-म्हसवंडी रस्त्याचे काम व्हावे म्हणून दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी पाठपुरावा केल्यानंतर रस्त्याचे काम मंजूर झाले आहे. परंतु, सध्या संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याचे काम अतिशय धिम्या गतीने चालू आहे. त्यात खडीकरण करण्यात आले, मात्र ठिकठिकाणी खडी निखळली आहे. याचा नाहक त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. निधी मंजूर असतानाही काम होत नसल्याने ‘आंधळं दळतंय नि कुत्र पीठ खातंय’ अशी अवस्था या रस्त्याबाबत झाली आहे.

    - उत्तम ढेरंगे , माजी सरपंच-आंबीदुमाला