अहमदनगरमध्ये आणखी एक हनीट्रॅप; पाथर्डीच्या शेतकऱ्याला अडकविले

    अहमदनगर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : पाथर्डी तालुक्यातील बागायतदाराला हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकून दोन लाख उकळविणारी टोळी नगरमध्ये पुन्हा एकदा उघडकीस आली आहे. तरुणीसह तिघांविरोधात याप्रकरणी नगरच्या एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या महिन्यात नगरमध्ये आणि गेल्या आठवड्यात अकोल्यात हनीट्रप उघडकीस आल्यानंतर नगरमध्ये दुसरा प्रकार समोर आला.

    पाथर्डी तालुक्यातील राघोहिवरे येथील शेतकऱ्याने या प्रकरणी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून नगरजवळील वडगाव गुप्ता येथील तरुणी, तरुण आणि राघोहिवरेमधील पंटर अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    चेकने दिले पैसे

    तरूणीने त्या बागायतदाराशी मैत्री करून त्याच्यासोबत फोटो काढले. या फोटोच्या आधारे त्याला ब्लॅकमेल करून दोन लाखांची खंडणी मागितली. या बागायतदाराने ट्रॅपवाल्या टोळीला चेकने पैसे दिले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने नगरमधील हनीट्रॅपची नवीन टोळी उघड झाली आहे. पोलिसांनी त्या ट्रॅपवाल्या टोळीविरोधात खंडणी, जबरी चोरी आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. १५ व १६ जून रोजी ही घटना घडली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर ती तरुणी, तरुण व पाथर्डी तालुक्यातील एका पंटर सध्या पसार झाले असून, एमआयडीसी पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

    असे अडकविले जाळ्यात

    तरूणीने त्या बागायतदाराला फोन करून त्याच्याशी मैत्री केली. या मैत्रीतून तिने त्या बागायतदाराला वडगाव गुप्ता येथील घरी बोलून घेतले. तेथे त्याच्यासोबत फोटो काढले. या फोटोच्या आधारे तरूणीने त्या बागायतदाराला ब्लॅकमेल करण्याचे ठरविले. १५ जूनला सायंकाळी बागायतदाराला घरी बोलून घेतले. ते दोघे एकत्र असताना त्याठिकाणी तरूणीचा पती आला. त्याने त्यांना एकत्र पाहिले असे भासवून बागायतदाराला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली.

    खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन बागायतदाराकडील पाच हजार रूपयांची रक्कम काढून घेतली. दुसऱ्या दिवशी पाथर्डी तालुक्यातील पंटरला मध्यस्थी घालून दोन लाख रूपयांचे तीन चेक घेतले. आपली फसवणूक झाली असल्याचे त्या बागायतदाराच्या लक्षात येताच त्याने झालेला सर्व प्रकार एमआयडीसी पोलिसांसमोर कथन करत फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे या गुन्ह्याचा तपास करत आहे.