बहुजन क्रांती मोर्चातर्फे उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

मागासवर्गीय व महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन
अहमदनगर: देशभरात मागासवर्गीय व अल्पसंख्यांक समाजावर तसेच महिलांवर होत असलेले सामूहिक अत्याचार, बलात्कार, हत्या, मॉबलिंचींग व इतर घटनांचे वाढत्या प्रमाणाला विरोध व निषेध करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने उद्या गुरुवार(दि.१५) ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात सर्व समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष राजेंद्र करंदीकर, शहराध्यक्ष गणेश चव्हाण, बहुजन मुक्ती पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भोसले यांनी केले आहे. या मोर्चास बहुजन मुक्ती पार्टीसह इतर संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

– माणुसकीला काळिमा फासणारी घटना
उत्तर प्रदेशातील हाथरस मध्ये दलित तरुणीवर सामूहिक अत्याचार करून निर्घुणपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर सरकारी अधिकार्‍यांनी उच्चवर्णीय समाजातील गुन्हेगारांना वाचविण्यासाठी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप संघटनेच्यावतीने करण्यात आला आहे. घडलेली घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. मोदी व योगी सरकारच्या राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले असून, जातिभेद वर्णद्वेषा तून संपूर्ण देशात सामूहिक अत्याचार, हत्या, बलात्काराच्या घटना वारंवार घडत आहेत. याचा विरोध व निषेध करण्यासाठी या हल्लाबोल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हे आंदोलन संपूर्ण देशात ३१ राज्यात ५५० जिल्ह्यात चार टप्प्यां मध्ये होत आहे. या शृंखला आंदोलनांतर्गत दुसर्‍या टप्प्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चाची सुरुवात जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून होणार आहे.