कळस बुद्रुक येथील ग्रामस्थांचे आत्मक्लेश आंदोलन मागे; अधिकाऱ्यांनी दिले लेखी आश्वासन

-आश्वासनाची पूर्तता न झाल्यास ठेकेदाराचे एकही वाहन रस्त्यावर चालू न देण्याचा आंदोलकांचा इशारा

    अकोले : अकोलेतील कोल्हार घोटी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० ह्या अकोले कळस रस्त्याचे काम दहा मीटर रुंदीचा रस्ता दहा दिवसांत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाने दिल्याने अकोले(जि.नगर) तालुक्यातील कळस बुद्रुक ग्रामस्थांनी आज सकाळपासून सुरू केलेले आत्मक्लेश आंदोलन स्थगित करण्यात आले.

    कळस बुद्रुक येथील ग्रामपंचायत सरपंच तथा रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गवांदे,भाजपा तालुका सरचिटणीस तथा कळस बुद्रुक ग्रामपंचायतचे माजी सरपंच भाऊसाहेब वाकचौरे, शिवसेना तालुका समन्वयक माजी ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब वाकचौरे, भारतीय जनता युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष ज्ञानदेव निसाळ, उपसरपंच ज्ञानेश्वर वाकचौरे यांनी संगमनेर अकोले तालुक्याचे सरहद्दीवर असलेल्या कळस बुद्रुक येथील प्रवरा नदीच्या पुलावर आत्मक्लेश आंदोलन सुरू केले होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग अकोलेचे उपविभागीय अभियंता जे. एम. कडाळे, उपविभागीय अभियंता संगमनेरचे सौरभ पाटील, शाखा अभियंता आर. डी. पाचोरकर, अकोले तालुका पोलीस निरीक्षक अभय परमार ,पोलीस पाटील गोपीनाथ ढगे यांनी याबाबत मध्यस्ती करून आंदोलन मिटवले.

    कोल्हार घोटी राज्य महामार्गाचे काम भाजपा सरकारच्या काळात सुरू केले आहे. मात्र काम अतिशय धिम्या गतीने सुरू आहे. अकोले तालुक्यातील गौण खनिज वापरून संगमनेर तालुक्यात काम सुरू आहे. अकोले तालुक्यातील काम बंद आहे. अकोले तालुक्यातील रस्ता खूप खराब झाला आहे. रस्त्यावरील नेहमीच्या गर्दीच्या वाहनांच्या वर्दळीमुळे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. धुळीमुळे व्यवसाय करणे अवघड होऊन बसले आहे.त्यात धूळ होऊ नये यासाठी रस्त्यावर सबंधित रस्ता विभागाकडून पाणीही मारले जात नाही. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठया खड्यांमुळे वाहनांचे वाहनचालकांनाचे शारीरिक स्थिती अवघड होऊन बसली आहे.प्रचंड खड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत आहे.अतिशय खराब झालेल्या या रस्त्यावर ठिकठिकाणी खोदून ठेवले आहे. अगस्ती कारखान्याचे ऊस वाहतूक सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तसेच अनेक लोकानां आपला मार्ग बदलावा लागला आहे. तर अनेकांना पाठीचा व मणक्याचा आजार बळावला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेक वेळा निवेदन देऊन ही याबाबत कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना आत्मक्लेश सारखे आंदोलन करण्याचा पवित्रा घ्यावा लागला असे अ आंदोलन कर्त्यांनी सांगितले.

    भाजपा सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मंजूर केलेले रस्त्याचे काम अतिशय धीम्या गतीने सुरू असून अकोले कळस हा रस्ता अकोले तालुका सरहद्दी पर्यंत चा रस्त्याचे काम बंद करून संगमनेर तालुका हद्दीत काम सुरू केले आहे. दहा दिवसांत जर काम झाले नाहीतर ठेकेदाराचे एकही वाहन रस्त्यावर चालू देणार नाही असा इशारा यावेळी आंदोलन कर्त्यांच्या वतीने आंदोलक तथा अकोले तालुका भाजपा सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.