court

    अहमदनगर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना नगर महापालिकेच्या नगररचना विभागातील अभियंते कल्याण बल्लाळ यांना पाठीशी घालणे भोवण्याची चिन्हे आहेत. या अभियंत्यावरील कारवाईला नगरविकास राज्यमंत्री म्हणून तनपुरेंनी दिलेल्या स्थगितीला येथील सामाजिक कार्यकर्ते शाकीरभाई शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे.

    न्यायालयाने या प्रकरणी राज्यमंत्री तनपुरेंसह प्रधानसचिव, मनपा आयुक्त व अभियंते बल्लाळ यांना नोटिसा बजावण्याचे आदेश दिले असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ जुलैला होणार आहे. नगरच्या महापालिकेतील उप अभियंता कल्याण बल्लाळ यांना पदावनत करण्याबाबतच्या कारवाईस नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिलेल्या स्थगिती विरोधात मुंबईउच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात शेख यांनी याचिका दाखल केली आहे. त्याची सुनावणी नुकतीच १६ जूनला मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती रवींद्रघुगे यांच्यासमोर झाली. त्या सुनावणीत याचिकाकर्ते शेख यांच्यावतीने अ‍ॅड. आविष्कार शेळके यांनी बाजू मांडली व त्यांना अ‍ॅड. अर्जुन लूक यांनी सहाय्य केले. तर सरकारच्या वतीने अ‍ॅड. व्ही.एन.पाटील-जाधव यांनी बाजू मांडली.

    दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने मनपा आयुक्त व बल्लाळ यांच्यासह नगरविकास राज्यमंत्री तनपुरे व राज्याच्या प्रधान सचिवांना नोटीस काढण्याचे आदेश दिले आहेत. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव व नगरविकास राज्यमंत्री तनपुरे यांच्यावतीने देखील अ‍ॅड. पाटील-जाधव यांनी बाजू मांडली. या प्रकरणाची सुनावणी १६ जुलै रोजी ठेवण्यात आली आहे.

    कल्याण बल्लाळ हे १९९५ साली तत्कालीन नगरपरिषदेमध्ये सबओव्हरसीयर या पदावर रुजू झाले. २००० मध्ये कनिष्ठ अभियंता ज्युनिअर इंजिनिअर हे पद भटक्या जमातीसाठी एन.टी. सरळ सेवेने भरती करण्यासाठी राखीव असताना त्या पदावर कल्याण बल्लाळ यांना नियमबाह्यपणे पदोन्नती देण्यात आली. वास्तविक बल्लाळ अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गाचे असतानाही त्यांना ही पदोन्नती बेकायदेशीरपणे देण्यात आली. त्यानंतरच्या काळात मनपाने बल्लाळ यांना उपअभियंता पदावर पदोन्नतीदेखील दिली.

    या विरोधात सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख हे शासनाच्या नगरविकास विभागाकडे २०११ पासून पाठपुरावा करीत आहे. त्यांनी नियमबाह्यपणे पदोन्नती झाल्याचे निदर्शनास आणून दिले. २०२० मध्ये शासनाने त्याची दखल घेऊन बल्लाळ यांच्या पदोन्नतीबाबत नियुक्त प्रातांधिकारी या नात्याने मनपा आयुक्त यांनी एक महिन्यात निर्णय घ्यावा व त्याप्रमाणे बल्लाळ यांना पदोन्नती देण्यात झालेल्या अनियमिततेस जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्‍चित करुन त्यांच्याविरोधात नियमानुसार शिस्तभंगाची कारवाईकरण्यात यावी, असे आदेश २८ फेब्रुवारी काढले.

    त्याप्रमाणे तत्कालीन आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी कार्यवाही न करता वेळकाढूपणा केला. त्याबाबतशेख यांनी नगरविकास विभागाकडे तक्रार करुन ही बाब निदर्शनास आणून दिली.त्यावरुन शासनाने ता. १० नोव्हेंबर २०२० रोजी मनपा आयुक्त यांना बल्लाळ यांची शाखा अभियंता या पदाच्या पदोन्नती साखळीतील सब ओव्हर सीयर या पदाच्या समकक्ष पदावर पदावनत करण्याचा निर्णय घेण्याचे आदेश दिले. पण, त्याप्रमाणे आयुक्त यांनी कार्यवाही न करता बल्लाळ यांना मोकळीक दिली.

    मात्र, या पदावनत करण्याच्या कार्यवाहीस रद्द करण्याबाबत बल्लाळ यांनी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे धाव घेतली. त्यांना चुकीची माहिती देत बल्लाळ यांनी पदावनतबाबतच्या कार्यवाहीस स्थगिती मिळविली. त्यामुळे बल्लाळ यांनी मिळविलेल्या स्थगिती विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.