निळवंडे कालव्यांच्या कामात पाईपलाईनची मोडतोड ; शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याची क्रांतीसेनेची जलसंपदा मंत्र्यांकडे मागणी 

संगमनेर : निळवंडे कालव्यांचे काम करताना संगमनेर तालुक्यातील शेतकर्‍यांनी प्रवरा नदीवरून आणलेल्या पाईपलाईन तोडल्या गेल्या आहेत. या पाईपलाईन पुन्हा दुरुस्त करण्यासाठी शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी. यासाठी बुधवारी (ता.१३) संगमनेर येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आले असता त्यांची भेट घेत अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या पदाधिकार्‍यांनी निवेदन देत मागणी केली आहे.

प्रवरा नदीपात्रातून शेतकर्‍यांनी गट तयार करून शेतीसाठी पाण्याच्या पाईपलाईन आणलेल्या आहेत. मात्र निळवंडेच्या पाटाचे काम सुरू झाल्यानंतर त्या तोडल्या गेल्या. या पाईपलाईन जोडणीसाठी शेतकर्‍यांना सध्या एक ते सव्वा लाख रुपये खर्च होत आहे. तोडलेल्या पाईपलाईन दुरुस्तीसाठी संबंधित विभागाने कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई शेतकर्‍यांना दिलेली नाही. अगोदरच कर्ज काढून असंख्य अडथळे पार करत शेतकर्‍यांनी शेतीसाठी पाणी आणण्यासाठी पाईपलाईन केलेल्या होत्या. त्यात शेतमालाला बाजारभाव नसल्याने शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती बेताची झाली आहे.

यामध्ये आणखी भर म्हणून तोडलेल्या पाईपलाईन दुरुस्तीचा खर्च पडत आहे. त्यामुळे लवकरात लवकर शेतकर्‍यांना शासनाने नुकसान भरपाई देऊन हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी अखिल भारतीय क्रांतीसेनेने निवेदनाद्वारे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. यावेळी क्रांतीसेनेचे युवक उत्तर नगर जिल्हाध्यक्ष युवराज सातपुते, तालुकाध्यक्ष अमित कोल्हे, युवक तालुकाध्यक्ष बाळासाहेब भोर व शेतकरी उपस्थित होते.