सत्तेपेक्षा नागरिकांचे प्रश्न महत्वाचे : मुख्यमंत्री ठाकरे

    अहमदनगर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना पक्ष सत्तेत आहे. या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी आपणास मिळत आहे. सर्वसामान्य जनतेची कामे होण्यासाठी शिवसेनेने नेहमीच पुढाकार घेतला आहे. सत्तेपेक्षा नागरिकांच्या प्रश्नांना महत्व दिले गेले आहे, हाच शिरस्ता यापुढेही सुरु ठेवा असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नगरच्या महापौर रोहिणी शेंडगे यांना दिला.

    अहमदनगर महापालिकेच्या महापौरपदी विराजमान झाल्यानंतर रोहिणी शेंडगे यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. संपर्कप्रमुख भाऊ कोरगांवकर, माजी नगरसेवक संजय शेंडगे यावेळी उपस्थित होते.

    प्रस्ताव पाठवा, निधीची तरतूद करू

    नगरच्या महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे या विराजमान झाल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह वाढला आहे. या पदाच्या माध्यमातून आपण नगरकरांची सेवा करुन पक्ष वाढीसाठी काम करावे. त्याचप्रमाणे आघाडीधर्मही पाळावा. नगरच्या विकासासाठी जे आवश्यक असणारे प्रकल्प राबविण्यासाठी आपण प्रस्ताव तयार करावेत. त्यासाठी आवश्यक त्या निधींची तरतूद केली जाईल. राज्य शासनाच्या विविध योजना महानगरपालिकेसाठी आहेत, अशा योजनांचा लाभ आपण घ्यावा. आपल्या कार्यात पक्षप्रमुख व मुख्यमंत्री म्हणून सदैव पाठिशी राहिल, अशा शुभेच्छा उद्धव ठाकरे यांनी महापौर रोहिणी शेंडगे यांना दिल्या.

    शिवसेनेचा सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न

    शिवसेनेने नेहमीच सर्वसामान्यांना विविध माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्तीला महापौरपदाचा मान फक्त शिवसेनेमुळे मिळाला आहे. या पदाच्या माध्यमातून शिवसेना पक्षाची प्रतिमा उंचविण्याचा प्रयत्न करु. त्याचबरोबर नगर शहरात मोठ-मोठे विकास प्रकल्प राबविण्याचा मानस आहे. पक्षप्रमुख ठाकरे यांनी मुख्यमंत्री नात्याने सहकार्याचा शब्द दिला आहे. त्यामाध्यमातून मोठा विकास निधी उपलब्ध होऊन नगरचा विकास करण्याचा प्रयत्न करणार आहे.

    – रोहिणी शेंडगे, महापौर.