नगर पोलिसांनी चोरून विकणारा गुटखा पकडला; तब्बल पावणेआठ लाखांचा माल जप्त

    अहमदनगर : अहमदनगर पोलिसांनी आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पुणे रोडवरील केडगाव येथे सुमारे आठ लाख रुपयांचा गुटखा जप्त करत दोघांना अटक केली. आसिफ शेख सिकंदर (रा. झेंडीगेट, अहमदनगर) आणि जावेद शेख निसार (रा.पंचपीर चावडी. नगर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

    केसरयुक्त विमल पान मसालाची दहा गोण्या, व्ही वन तंबाखू नाव असलेल्या गुटख्याच्या दहा गोण्या आणि अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो असा सात लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. महाराष्ट्र राज्यात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री व कब्जात बाळगून वाहतूक करण्यास प्रतिबंध आहे. असे असतानाही चोरून गुटखा विक्री सुरू असल्याची माहिती डीवायएसपी विशाल डुमे यांना खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलिस पथक नियुक्त करत केडगाव बायपास चौकात सापळा लावला.

    नगरकडून पुण्याकडे जाणारा टेम्पो पोलिसांनी अडवीत त्याची झडती घेतली असता विमल पान मसाला आणि व्ही वन तंबाखूची पॅकेट आढळून आले. अन्न व औषध प्रशासन कळल्यानंतर नगर पोलिसांनी टेम्पो आणि गुटका ताब्यात घेतला आहे. पोलीस कॉन्स्टेबल सागर द्वारके यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    रॅकेटपर्यंत पोलिस पोचणार का?

    राज्यात गुटखा विक्रीला बंदी असली तरी विक्रेत्यांनी यंत्रणेला ‘मॅनेज’ करत चोरीचुपके गुटखा विक्री सुरू केली आहे. त्याचे मोठे रॅकेट अहमदनगरमध्ये कार्यरत आहे. नगर पोलिसांनी गुटख्याच्या केलेल्या कारवाईत केवळ एक कडी हाती लागली आहे. आणखी मोठे रॅकेट यामागे असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलिस रॅकेटपर्यंत पोहोचणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.