ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुका लक्षात घेता; दारू तस्करी रोखण्याची गरज

गावाच्या विकासासाठी असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका दारूमुळे गाव भकास करतात . त्यामुळे गावातील जाणत्या लोकांनी गांभीर्य ओळखून दारू वाटणाऱ्या व तरूणांना हॉटेलवर नेणाऱ्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे .

कर्जत: कर्जत तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुका लक्षात घेता , दारूच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे . यातून सामाजिक स्वास्थ बिघडण्याची भीती असल्याने या निवडणुकीच्या काळात दारूचा पुरवठा होऊ नये म्हणून दारू तस्करी रोखण्याचे मोठे आव्हान पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे आहे . लग्नातील वराती आणि निवडणूक हे दारू पाजणे आणि पिण्याचे निमित्त बनले आहे . या संधीचा फायदा घेत हवसे नवसे फुकटची दारू प्राशन करून सामाजिक स्वास्थ बिघडविण्याचे काम करीत असतात . ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत हा माहोल आठ दिवस चालतो . यातून गावागावात भांडणे वाढून कुरापती वाढतात , मारामारीच्या घटना घडतात व कायमस्वरूपी वैर वाढून गाव दोन गटात विभागले जाते , तर काही मुले यातून आयुष्यभर दारूच्या आहारी जाऊन जीवन उद्ध्वस्त करून बसतात . गावाच्या विकासासाठी असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका दारूमुळे गाव भकास करतात . त्यामुळे गावातील जाणत्या लोकांनी गांभीर्य ओळखून दारू वाटणाऱ्या व तरूणांना हॉटेलवर नेणाऱ्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे . तसेच पोलीस व राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी रात्री दारूची वाहतूक होणार नाही , यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे