सामुहिक प्रयत्नांतून लवकरच कोरोना हद्दपार होईल

अहमदनगर: कोविडविरूद्धची मोठी लढाई सध्या आपण सर्व जण मिळून लढत आहोत. यात योगदान देणाऱ्या प्रत्येक जण करोनायोद्धा आहे. नगरमध्ये अनेक संस्था उत्स्फूर्तपणे पुढे येऊन कोविड रूग्णांना सेवा देत आहेत. प्रत्येक कोविड सेंटरमध्ये आपुलकीची सेवा मिळत असल्याने नगर शहरातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. अशाच सामूहिक प्रयत्नांतून लवकरच कोविड हद्दपार झालेला दिसेल,असे प्रतिपादन अहमदनगर सीए असोसिएशनचे चेअरमन सीए किरण भंडारी यांनी केले.

नगर शहरात आयुर्वेद महाविद्यालय व बडीसाजन मंगल कार्यालयात कोविड केअर सेंटर चालवणारा गुरू आनंद फौंडेशनने आपले कार्य व मदत स्वताच्या कोविड सेंटर पुरते मर्यादित न ठेवता शहरातील अन्य कोविड सेंटरमध्येही वेळोवेळी मदत केली आहे. याअंतर्गत गुरू आनंद फौंडेशन व सीए असोसिएशनतर्फे जिल्हा रुग्णालय,रोटरी कोविड सेंटर,मनपाचे नटराज कोविड सेंटर,गुरू अर्जुन महिला कोविड सेंटर, बुथ हॉस्पिटल या ठिका णी रूग्णां साठी डाबर कंपनीचे संत्री ज्युसचे सीलबंद टेट्रा पॅकचे १५० बॉक्स भेट देण्यात आले.

याप्रसंगी सीए असोसिएशनचे चेअरमन सीए किरण भंडारी, युवा जैन कॉन्फरन्स महाराष्ट्राचे अध्यक्ष,गुरू आनंद फौंडेशनचे धनेश कोठारी, सीए संदीप देसरडा,मर्चंट बॅंकेचे संचालक अमित मुथा, रोशन चोरडिया,अमित अनेचा आदी उपस्थित होते.

-रूग्णांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करणार
धनेश कोठारी म्हणाले की,करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर फाऊंडेशनने सर्व प्रथम आयुर्वेद महाविद्यालय येथे आ. संग्राम जगताप यांच्या सहकार्याने कोविड केअर सेंटर सुरू केले. यानंतर बडीसाजन कार्यालयात कोविड सेंटर सुरू करण्यात आले. आतापर्यंत सुमारे दोन हजार हून अधिक रूग्ण ठणठणीत बरे होऊन हसतमुखाने घरी गेले आहेत. कोरोनाचे निदान लवकर होण्यासाठी आम्ही थायरोकेअरच्या सहकार्याने अल्प दरात आरटीपीसीआर चाचणीचीही सोय केली आहे. आताच्या संकटकाळात सर्वच करोनायोद्ध्यांचे हात बळकट करण्यासाठी वेळोवेळी अन्य कोविड सेंटरलाही मदत केली आहे.भविष्यातही अशीच मदत करुन जास्तीत जास्त रूग्णांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.